भारताच्या "या" ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 06, 2020
आज ६ डिसेंबर, हा दिवस भारतीय संघासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज एक दोन नव्हे तर तब्बल ५ भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे या पाचही क्रिकेटपटूंनी भारतीय संघासाठी खेळताना महत्त्वाचे योगदान दिले आहे. कोण आहे ते पाच क्रिकेटपटू ते आज या लेखातून पाहूया.

आज वाढदिवस असणारे भारतीय क्रिकेटपटू:::-

रवींद्र जडेजा:::-
भारताचा फिरकीपटू जडेजा आज ३२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या तो भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जडेजाने त्याच्या अष्टपैलू खेळीने आणि अफलातून फिटनेसने त्याची वेगळी ओळख तयार केली आहे.

त्याने आत्तापर्यंत ४९ कसोटी सामने खेळले असून यात १८६९ धावा आणि २१३ विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने १६८ वनडे सामन्यात २४११ धावा आणि १८८ विकेट्स घेतल्या आहेत. तर ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २१७ धावा आणि ३९ विकेट्स घेतल्या आहेत.


जसप्रीत बुमराह:::-
जलदगती गोलंदाज असणारा बुमराहचा हा २७ वा वाढदिवस आहे. आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत वनडे आणि कसोटीमध्ये पहिल्या १० गोलंदजांमध्ये बुमराहचा समावेश आहे.

बुमराहने मागील काही वर्षात भारताचा एक उत्तम वेगवान गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तो आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे.

त्याने आत्तापर्यंत ६७ वनडे सामन्यात १०८ विकेट्स घेतले आहेत. तर ५० टी२० सामन्यात ५९ विकेट्स घेतले आहेत. तसेच कसोटीमध्ये बुमराहने १४ सामन्यात ६८ विकेट्स घेतल्या आहेत.

आरपी सिंग:::-
२००७ च्या टी२० विश्वचषकात भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावणारा गोलंदाज आरपी सिंग आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आरपी सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १४ कसोटी सामन्यात ४० बळी, तर ५८ वनडे सामन्यात ६९ बळी घेतले आहेत. तसेच त्याने १० टी२० सामन्यात १५ बळी मिळवले आहेत.


करुण नायर:::-
भारतीय फलंदाज करूण नायरचा आज २९ वा वाढदिवस आहे. नायरने भारताकडून खेळताना २०१६मध्ये इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्रिशतक केले होते. भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा तो विरेंद्र सेहवाग नंतरचा तो दुसराच खेळाडू आहे.

त्याने आत्तापर्यंत ६ कसोटी सामने आणि २ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीमध्ये ३७४ धावा आणि वनडेत ४६ धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यर:::-
भारताचा प्रतिभाशाली युवा फलंदाज श्रेयस अय्यर आज त्याचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अय्यरने २०१७मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.

त्याने मागील काही महिन्यांत चांगली कामगिरी करत स्वत:ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. तसेच तो आता मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे.

त्याने आत्तापर्यंत २१ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकांसह ८०७ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने २२ सामने खेळले असून यात त्याने ४१७ धावा केल्या आहेत.