गावागावातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; १५ जानेवारीला होणार मतदान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 14, 2021
चंद्रपूर:- गेल्या आठ दिवसांपासून धडाडणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावल्या. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी आता उमेदवारांनी सेटिंग्ज सुरू केली आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. ५ हजार १५९ ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून या निवडणुकीच्या प्रत्येक उमेदवाराने जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी पॅनेल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंग भरला. ग्रामपंचायतीचा मतदारसंघ अत्यंत छोटा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. तर काहींनी शक्तिप्रदर्शन करून गावात आपलीच वट असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.


    अनेक उमेदवारांनी पत्नी आणि मुलीला प्रचारात उतरवून महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. निवडून आल्यावर गावचा विकास कसा करणार? गावात कशा समस्या आहेत आणि जुन्या सदस्यांनी काम कसे केले नाही हे अनेक उमेदवार मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला. अनेकांनी भावकीतल्या लोकांची भेट घेऊन मतदान करण्याचीही विनंती केली. आता प्रचार संपल्याने आज रात्री उशिरापर्यंत गावातील गट, मंडळ आणि तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी सेटिंग्ज सुरू होणार आहे. त्यात या उमेदवारांना कितपत यश आले हे निकालाच्या दिवशीच समजून येणार आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.