Top News

चंद्रपूर महावितरणने तब्बल ४ हजार ५८५ वीज ग्राहकांना दिला शॉक.

Bhairav Diwase.    Feb 26, 2021
चंद्रपूर:- कोरोनाकाळात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून वीजबिल थकविलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५८५ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज शाॅक दिला आहे. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारीपर्यंत वीजबिल न भरल्यास उर्वरित ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे. पोकळ आश्वासनांमुळे विनाकारण अंधारात राहण्याची वेळ सामान्य वीज ग्राहकांवर आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर महिन्यात वीजबिल भरत होते. त्यांनीही काही राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे बिल माफ होईल या आशेपोटी बिल भरणे टाळले.

दरम्यान, यासाठी विविध आंदोलनेही झाली. मात्र, सरकारने आजपर्यंत यावर कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या बिलाचा भर पडत ग्राहकांवर सद्यस्थितीत हजारो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे महावितरणने आता सक्त पाऊल उचलले असून थकबाकीदारांची वीज कट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यासाठी महावितरणला वरिष्ठांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत वसुली करण्याचे सक्त आदेश आले आहे. दरम्यान, २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ४ हजार ५८५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर मंडळातील ३ हजार ३५८ घरगुती, १०५८ वाणिज्यिक व १६९ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

४६ हजार ८७९ ग्राहकांनी थकविले बिल
एप्रिल २०२० पासून २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ८८ हजार २१४ ग्राहकांनी ७० कोटींचा २० लाखांचा भरणा केला नाही. चंद्रपूर मंडळातील ४६ हजार ८७९ हजार ग्राहकांनी ४४ कोटी ५० लाख व गडचिरोली मंडळातील ४१ हजार ३३५ ग्राहकांनी २५ कोटी ८० लाख भरले नाहीत.

२८ हजार ग्राहक बचावले.....
मागील दहा महिन्यांपासून एकही वीजबिल न भरलेल्या ग्राहकांपैकी २८ हजार २८ ग्राहकांनी २३ कोटी ७० लाखांच्या वीजबिलाचा भरणा केला. त्यामुळे या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्यापासून बचावले आहे.


सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदारांनी वीजबिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
सुनील देशपांडे ,
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने