रोखपालावर अफरातफर केल्याचा आरोप.
चंद्रपुर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर येथील शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं वृत्त आहे. हा आर्थिक घोटाळा तब्बल दीड कोटींचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या प्रकरणी रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तिवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या व्यक्तिने ग्राहकांची फसवणूक करून त्यांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.
एका सहकारी सोसायटीने भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने या घोटाळ्याचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्याची तयारी सुरू झाली आहे.
काल रात्रभर बँकेच्या पथकाने या शाखेत चौकशी जारी ठेवली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे पोलिसात तक्रार देण्यासाठी याची व्याप्ती पाहिली जात आहे.
याच पद्धतीने किती ग्राहकांना फसवले गेले याचा तपशील चौकशीत पुढे येणार आहे. सुमारे 4 महिन्यापूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना भ्रष्टाचार प्रकरणात चक्क तुरुंगाची हवा खावी लागली होती आणि त्यांना दूर करत नवी सत्ता विराजमान झाली. आता नव्या कारभा-यांच्या नाकाखाली कोट्यवधींचा अपहार झाल्याने बँकेची पुरती बदनामी झाली आहे.