Click Here...👇👇👇

दारूविक्रेते, रेती तस्कर, गुटखामाफिया एलसीबीच्या रडारवर.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.       Feb 08, 2021
चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुविक्रेते, रेती तस्कर व गुटखामाफिया विरूद्ध धाडसत्र सुरू केले आहे. मागील दोन दिवसांत आठ ठिकाणी कारवाई करून अवैध दारू, रेती व सुंगधीत तंबाखू असा सुमारे ३२ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसत्राने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध गट तयार करण्यात आले असून, अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले आहे.

बल्लारपूर पोलीस स्थानक हद्दीतील कारवा जंगल परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून २१ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी बापू रंगारी धम्मदीप चौक, अनिल मारशेट्टीवार बुद्धनगर, निखील रणदिवे, श्रीकांत कोडबल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमूर येथे सुंगधीत तंबाखू साठवून त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोहर पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्गापूर पोलीस स्थानक हद्दीत चार ठिकाणी कारवाई करून दोन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून भागीरथ ठाकूर समतानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शेगाव रोड फाट्यावर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह सात लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसात आठ ठिकाणी केलेल्या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, सुरेश केमेकर, पंडित वऱ्हाडे, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमजद खान, चंदू नागरे, सुरेंद्र महोतो, गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, कुंदनसिंह बावरी, प्रदीप मडावी, मयुर येरमे, गणेश मोहुर्ले, प्रांजल झिलपे आदींनी केली.