पोलिसांना इशारा देणारे बॅनर्स लावून नक्षलवाद्यांनी रोखली वाहतूक.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   March 26, 2021
भामरागड:- गडचिरोलीत नक्षल्यांनी मोठे धाडस करत भामरागड नदीचा पूल पार करत थेट भामरागड गावात प्रवेश केल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर त्यांनी दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पर्लकोटा नदी पुलावर येत रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी थेट बॅनर्स लावले. या बॅनरमधून नक्षलवाद्यानी पोलिसांना मजकुरातून इशारा दिला आहे. अत्यंत कमी उंचीच्या या नदी पुलाचे नवे बांधकाम 20 वर्षानंतर पुन्हा सुरू झाले आहे.

नक्षल्यानी बॅनर-पत्रके बांधल्याने सकाळपासून इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. काही रुग्णवाहिका- नागपूर-गडचिरोली- चंद्रपूर जाणा-या एस. टी. बसेस दहशतीमुळे खोळंबल्या होत्या. माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने पोचत काळजीपूर्वक रस्ता खुला केला.
नक्षलवाद्यांनी भामरागड तालुकास्थानाला जोडणा-या एकमेव मार्गावर ठळक उपस्थिती दर्शविल्याने प्रशासनात दहशत आणि खळबळ उडाली आहे. 17 मार्च 2021 रोजी या नदीपुल बांधकामावरील पोकलेनची अज्ञातांनी जाळपोळ केली होती. आजच्या घटनेत बॅनरवरील मजकूर 23 मार्चशी संबंधीत आहे. त्यामुळे हा नक्षल्यांच्या नावावर कुणाचा खोडसाळपणा आहे का, याचाही तपास केला जात आहे.