"त्या" आरोपींवर कठोर कारवाई करा.

Bhairav Diwase
रऊफखाॅं पठाण यांची पत्रपरिषदेत मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दि.२७ फेब्रुवारी रोजी आपल्यावर प्राणघातक हल्ला करणा-या दारु माफियावर भा.दं.वि.३०७ सारखी कलम लावून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मी पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसेन असा इशारा भीम आर्मीच्या मुस्लिम भाईचारा समितीचे जिल्हा प्रमुख रऊफखाॅं सत्तारखाॅं पठाण यांनी पत्रपरिषदेत दिला.
      पत्रपरिषदेत रऊफखाॅं पठाण यांनी सांगितले की, दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान अक्षय मन्ने या दारुमाफियाने मला त्याच्या घरी बोलावून आपल्या १०-१५ साथीदारांसह माझ्यावर सशस्त्र हल्ला केला. त्यात माझ्या डोळ्याला व हाताच्या बोटांना इजा झाली. मी मरण पावलो असे समजून हल्लेखोर मला तेथेच सोडून पसार झाले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. प्राणघातक हल्ला झाला असताना पोलिसांनी आरोपींवर ३२५ कलम लावून सौम्य प्रकारची कारवाई केली.त्यामुळे आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत असून त्यांच्याकडून सर्रास दारुविक्री सुरु आहे. आरोपींवर कारवाई करताना पोलिसांनी आपले बयाणसुद्धा घेतले नाही.तसेच आपली स्वाक्षरीसुद्धा घेतली नाही. याबाबत ठाणेदारांना विचारणा केली असता तुमच्या बयाणाची काही आवश्यकता नाही असे उत्तर मिळाल्याचेही पठाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. 
      आरोपिंनी 'तू आता वाचलास, परंतू यापुढच्या हल्ल्यात तू वाचणार नाहीस' अशी मला धमकी दिली असून माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पोलीसच जबाबदार राहतील असेही पठाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. आरोपीला तुरुंगात पाठविल्याचे ठाणेदारांनी सांगितले.मात्र आरोपी गावातच फिरत होता असा दावाही पठाण यांनी पत्रपरिषदेत केला.मला रोज दुध आणण्याकरीता हेटी-घोट निंबाळा येथे जावे लागते.तेथेच आरोपींची दारुविक्री सुरु असते. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत एका सामाजिक कार्यकर्त्यावर आणि एका संघटनेच्या जिल्हा प्रमुखावर असा हल्ला होत असेल,तर सर्वसामान्य जनतेचे काय ? असा प्रश्नही पठाण यांनी शेवटी पत्रपरिषदेत उपस्थित केला.