अखेर.....! तापाने आजारी मेहा गाव झाले सील.

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- तालुक्यातील मेहा बु. हे गाव मागील काही दिवसापासून तापाच्या साथीने हैराण झाले आहे. आरोग्य विभागाने २०० हुन अधिक लोकांची आरोग्य तपासणी केली. यात जवळपास २१ जण पॉझिटिव्ह निघाले. दरम्यान, येथील तापाच्या आजाराने १५ दिवसात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तापाच्या आजाराचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती असल्याने मेहा गावचे तिन्ही प्रमुख मार्ग सील करण्यात आले आहेत.
अख्खे गाव तापाने फणफणत असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खळबळून जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने तातडीने शिबीर घेतले. सर्व घरांमध्ये तापाचे एक- दोन रुग्ण आहेत. तापाच्या साथीने आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चार दिवस २०० हुन अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात जवळपास २१ जण पॉझिटिव्ह निघाले. या सर्वावर सावली, पाथरी आणि निफंद्रा येथील कोविड केअर सेंटरला उपचार सुरु आहे. तापाच्या आजाराचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती असल्याने मेहा गावचे तिन्ही मार्ग सील करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांना येथे प्रवेशबंदी असेल. ज्या वस्तीत अधिक रुग्ण सापडले, अश्या गल्यांचे मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आले.
दरम्यान गावात ग्रामपंचायतीने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गावात विनाकारण बाहेर फिरू नये आणि सार्वजनिक विहीर, हातपंपावर येणाऱ्या महिलांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.