गडचिरोली प्रशासनाने छापा टाकून केले बंद.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज शहरात खासगी रुग्णालयात अवैध कोविड सेंटरवर प्रशासनाने धाड टाकून एका रुग्णालय सील केले आहे. तर दुसऱ्या रुग्णालयात कारवाई प्रस्तावित करुन त्या रुग्णालयातल्या रुग्णांच्या देखरेखीची जबाबदारी शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या कारवाईने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यानंतर जिल्ह्यात औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्यात रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार होत असले तरी खासगी रुग्णालयाकडे जाऊन उपचार करण्यावर अनेकांचा कल असल्याने देसाईगंज शहरातल्या दोन खासगी रुग्णालयांनी त्या परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार सुरू केले.
या रुग्णावर उपचार करण्याच्या नावाखाली गडगंज फीसही रुग्णांकडून वसुल केली जाऊ लागली. देसाईगंज शहरातील कब्रस्तान रोडवरील अर्धसैनिक कँटिंनसमोर डॉ.मनोज बुद्ध आणि डॉ. बनसोडे या दोघांचे खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली कुठलीही परवानगी नसताना हे कोविड रुग्णालय अवैधपणे सुरू होते. पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करुन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक प्रशासनाने त्वरित रुग्णालयात छापा टाकला.
डाॅ.बनसोड रुग्णालयात दाखल झालेल्या कोविडच्या गंभीर रुग्णांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून तीन रुग्णांना तिथेच वैद्यकीय अधीक्षकांच्या देखरेखीखाली उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. डॉ. बनसोड यांना कोविड रूग्णांना घेऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून केल्या आहेत. दुसरीकडे डॉ. मनोज बुधे यांना देसाईगंज स्मशानभूमी रोडलगत अर्धसैनिक कँटीन समोरील आवारात परवानगीशिवाय कोरोना सेंटर बांधून रूग्णांवर उपचाराची माहिती मिळाली. त्यानंतर तहसीलदार संतोष महाले, दंडाधिकारी डॉ कुलभूषण रामटेके, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, तहसील आरोग्य अधिकारी डॉ.अभिषेक कुमरे व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. डाॅ मनोज बुधे यांचे रुग्णालय सील करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.