Top News

कर्मचारी धावून आल्याने मिळाले उपचार अन् वाचले तिचे व बाळाचे प्राण.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
भामरागड:- गडचिरोली जिल्ह्यात विशेषत: भागरागड तालुक्‍यात आरोग्यसुविधांचा अभाव आहे. मात्र, अनेकदा आरोग्याच्या समस्येने आक्रंदत असलेल्या रुग्णाच्या मदतीला आरोग्य विभागासह पोलिस विभागही देवदुतासारखेच धावून येते. हाच प्रकार ताडगाव येथील मातेच्या संदर्भात घडला. नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेच्या नवजात बालकाची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र, मदतीला आरोग्य व पोलिस विभागाचे कर्मचारी धावून आल्याने तिला तातडीने उपचार मिळाले आणि तिचे व बाळाचे प्राण वाचले.
दुर्गम व संवेदनशील असलेल्या ताडगाव येथील रूपी वारलू मडावी या गरोदर मातेची अचानक प्रसूती झाल्याची माहिती मिळताच ताडगाव येथील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मानकर व आरोग्यसेविका वाढणकर, आशावर्कर बावणे या आरोग्यपथकाने रुग्णवाहिकेसह प्रसूत महिलेच्या घरी माता व बालकावर तत्काळ प्राथमिक उपचार केले.
नवजात बालक हे कमी वजनाचे असल्याने व प्रसूत मातेला वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे आवश्‍यक असल्याने डॉ. मानकर यांच्या वैद्यकीय पथकाने पुढील उपचारासाठी या मातेला व बालकाला ग्रामीण रुग्णालयात भामरागड येथे पाठविणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. परंतु, वैद्यकीय पथकाने वारंवार विनंती करूनही प्रसूत माता व कुटुंबातील नातेवाइकांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला.
ही माहिती आरोग्य विभागाने पोलिस मदत केंद्र ताडगाव येथे देताच पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक सौरभ पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक अहिरे, पोलिस उपनिरीक्षक सयाम व सहकारी यांनी प्रसूत महिलेच्या घरी भेट देऊन महिला अंमलदार मीना गावडे, गोपिका सडमेक, शालिनी तोडे यांच्यामार्फत स्थानिक भाषेत वैद्यकीय उपचार घेणे किती आवश्‍यक आहे, असे प्रसूत माता व तिच्या नातेवाइकांना समजावून सांगितले. पोलिस प्रशासनाने समजावून सांगितल्यानंतर प्रसूत माता व नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी रवाना होण्यास सहमती दर्शवली.
आरोग्य पथकाच्या देखरेखीखाली महिलेस तत्काळ ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या ही प्रसूत माता व नवजात बालकाची प्रकृर्ती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्‍टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. वेळेवर येऊन मदत केल्याबद्दल तिचे पती वारलू मडावी यांनी ताडगाव आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.

अफवा, अंधश्रद्धेचा पगडा.....

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत आजही अंधश्रद्धांचा मोठा पगडा आहे. त्यात आता कोरोनाविषयक अफवांनी भर घातली आहे. त्यामुळे नागरिक सरकारी रुग्णालयात जाणेही टाळतात. अगदी जिवावर बेतत असतानाही सरकारी आरोग्यसेवा स्वीकारायला अनेकजण तयार होत नाही, हेच या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धेची जळमटे, कोरोनाविषयक गैरसमज, अफवांचा कचरा दूर करणे आवश्‍यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने