💻

💻

दुचाकीस्वाराने अडवला 2 वाघांचा रस्ता.

रस्ता अडवून केला नियमभंग.

रस्ता अडवल्याचा व्हिडिओ व्हायरल.
Bhairav Diwase. June 01, 2021

 चंद्रपूर:- येथील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वाघ जोडीचा रस्ता एका अतिउत्साही दुचाकीस्वाराने अडविल्यानंतर ताडोबात करावयाच्या शिस्तीचे पालन चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. काल सकाळी पद्मापूर बफर गेटच्या आत काही मीटर अंतरावर ही घटना समोर आली. पद्मापूर गेटच्या आत बफर क्षेत्रात विविध गावातील रहिवासी यांना ये-जा करण्यासाठी मुक्त संचार आहे. सकाळी वाघाची एक जोडी या संरक्षित क्षेत्रातील मार्गावरुन भ्रमण करत होती. या जोडीला बघण्यासाठी मोठ्या संख्येत वाहनांच्या रांगा मागे व पुढे लागल्या. यातील एका दुचाकीस्वाराने वाघ जोडीच्या अगदी समोर जात त्यांचे चित्रिकरण सुरु केले.उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याबाबत इशारा दिला.

मात्र दुचाकीस्वाराने चित्रिकरण सुरूच ठेवले. त्याचे हे धाडस इतरांनी मात्र आपल्या व्हिडिओत कैद केले. अगदी जवळ आलेल्या वाघाला अस्तित्व विसरून चित्रिकरण सुरु ठेवल्याने अखेर वाघाने आपला मोर्चा मुख्य मार्ग सोडून जंगलाकडे वळवला. दुचाकीस्वाराने त्याची दखलही न घेता चित्रिकरण सुरू ठेवले.त्यातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुचाकीस्वाराने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्वतःच्या फेसबुक वॉलवर शेअर केला.

बफर क्षेत्रात अति उत्साहीपणाचा कळस....

अशाप्रकारे दुचाकीस्वार अथवा पर्यटकांनी वाघासोबत धाडस करण्याचा हा पहिलाच प्रसंग नव्हे. याआधीही ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात अशा पद्धतीने अति उत्साहीपणाचे अनेक प्रसंग पर्यटकांच्या सजगतेने उजेडात आले आहेत. त्याबाबत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर कारवाई देखील केली आहे. काही प्रसंगी जिप्सी अथवा गाईड यांनी प्रसंगावधान न राखल्याने त्यांना तंबी देत काम देखील बंद केले आहे. मात्र आता मुद्दा बफर क्षेत्रातील दुचाकीस्वार अथवा पर्यटकांचा आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये वाघ-मानव संघर्षात तब्बल 20 हून अधिक ग्रामस्थांचा बळी गेला आहे. अशा परिस्थितीत असे धाडस दाखविणे धोक्याचे ठरले असते. उन्हाळ्याचा अंतिम टप्पा असताना जंगलातील नैसर्गिक पाणवठयातील पाणी आटत चालले आहे. आणि म्हणून वन्यजीव अथवा वाघ यांची धाव उत्तम पाणीसाठा असलेल्या तलाव अथवा छोट्या बोड्यांकडे असते. अशा परिस्थितीत वन्यजीवांचा मार्ग रोखून व्हिडिओचे धाडस करणे अंगलट येऊ शकते.

संपूर्ण प्रकाराची घेतली दखल

या संपूर्ण प्रकाराची दखल ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने घेतली आहे. या पर्यटक अथवा दुचाकीस्वारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्हा हा किमान दोनशे वाघ असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कोणत्याही वन व्याप्त खेड्यातील ग्रामस्थ गेली कित्येक वर्षे वाघासोबत सहजीवन व्यतीत करत आहेत. त्यांनी या सहजीवनाचा बाबतीत स्वतः घालून घेतलेले नियम आणि खबरदारी यामुळेच वाघ वाचला आहे. असे स्वनियमन पर्यटक व इतरांना कधी जमणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा चुका टाळण्यासाठी अतिहौशी पर्यटक -दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई मात्र गरजेची आहे, अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत