Top News

चंद्रपूर मनपात सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की! #Chandrapur


चंद्रपूर:- जनतेतून निवडून आल्यावर विकासकामांसाठी कधी न भांडणारे नगरसेवक आज चंद्रपूर मनपाच्या सभागृहात फ्री स्टाईल वर उतरले इतकेच नव्हे तर कांग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्या समोरील टेबल ठोकला, त्यानंतर चक्क महापौर कंचर्लावार यांनी स्वतःची नेमप्लेट नागरकर यांच्यावर फेकली. #Chandrapur
चंद्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये झोम्बझोम्बी आणि शिवीगाळ झाली. यामुळं ही आमसभा गुंडाळावी लागली. सभेची सुरुवात होताच मनसे सदस्य सचिन भोयर यांनी रस्त्याची समस्या मांडण्यासाठी अंगावर चिखल घेत सभागृहात प्रवेश केला. पाठोपाठ काँग्रेस सदस्य आले. लेखापरीक्षण अहवालातील 200 कोटींचा अपहार, वीज केंद्रातील दोन संचांचा मालमत्ता कर न घेणे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोविड हॉस्पीटलच्या नावाखाली केलेली रुग्णांची लूट, हे विषय घेऊन काँग्रेस सदस्य महापौरांच्या समोर आले. हातात निषेधाचा फलक झळकावत हे सदस्य घोषणाबाजी करीत असतानाच महापौर राखी कंचरलावार यांनी या सदस्यांवर नेमप्लेट भिरकावली.
त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झाल्यावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे खाली उतरले आणि काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर यांच्याशी भिडले. दोघात धक्काबुक्की झाली. प्रकरण तापत असल्याचं लक्षात येताच आयुक्त राजेश मोहिते आणि उपस्थित सदस्यांनी दोघांना वेगळं केलं. यावेळी शिवीगाळ झाल्याचंही या चित्रीकरणात ऐकायला येत आहे. शेवटी या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करीत असून, प्रश्नही मांडू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
दरम्यान आज घडलेल्या प्रकारासाठी विरोधकांची कृती कारणीभूत असल्याचा प्रतिहल्ला महापौरांनी केला. काँग्रेस सदस्याने महापौरांचा टेबल ठोकला. हे कृत्य महापौर आणि सभागृहाचा अवमान करणारे आहे. त्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना दिल्याची माहिती महापौरांनी दिली. महापौर राखी कंचर्लावार यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी व कोरोना नियमांना पायदळी तुडविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी यासाठी लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
कोविड नियम लागू असल्याने सध्या मनपाची आमसभा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होत आहे, मात्र काही नगरसेवकांनी तब्बल 4 वर्षानंतर रस्त्यावरील खड्डयांसंदर्भात आंदोलन करीत कार्यकर्त्यांसाहित पालिकेच्या आवारात शिरत गर्दी केली.
आज झालेल्या या गोंधळामुळे शहरात होणारा "विकास" सुद्धा आश्चर्यचकित झाला असेलच, कांग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांचेवर निलंबनाची कार्यवाही होण्याची शक्यता वाढली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने