(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- एकाच सरपंचाला मतदान करून दोनदा निवडून आणण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका अंतर्गत येणाऱ्या बेंबाळ येथील ग्रामस्थांनी केले आहे. या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंचां विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र गावकऱ्यांनी निवडून दिलेल्या सरपंचावर पुन्हा विश्वास दाखवत अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करून सरपंचाचे पद अबाधित राखले.
सदस्यांनी सरपंचावर आणलेला अविश्वास ठराव मतदानाच्या माध्यमातून लोकांनी मोडीत काढला आहे. बेंबाळ येथील सरपंच करुणा उराडे यांना नागरिकांनी बहुमताने निवडून दिले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या सर्वही सदस्यांनी बहुमताने अविश्वास ठराव पारित केला. मात्र सरपंच या नागरिकांमधून निवडून आले असल्याने या अविश्वास प्रस्तावाला सरपंच यांनी आव्हान दिले होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागून न्याय मिळवून घेतला.
आज अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्याकरिता ग्रामसभा घेण्यात आली आणि या ग्रामसभेच्या माध्यमातून गुप्त मतदान घेण्यात आले. सरपंचपद बाधित ठेवण्याकरिता नागरिकांनी पुन्हा त्यांच्या बाजूने मतदान केले. जवळपास 200 ते अडीचशे मताच्या फरकाने विद्यमान सरपंच करुणा उराडे यांचा विजय झाला. आणि हा अविश्वास प्रस्ताव बारगळला. एकाच व्यक्तीला त्याच्या कार्यकाळात मतदान करून एकाच पदावर दोनदा निवडून देण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असावी अशी चर्चा ऐकायला मिळाली.
ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच विरुद्ध गेले असले तरी ज्या नागरिकांनी सरपंच यांना निवडून दिले होते त्यांनी सरपंचावरील आपला विश्वास अजूनही अबाधित ठेवला आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने झालेल्या प्रक्रियेने लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच हातभार लागेल असे म्हणता येईल.
माझ्यावर लावलेले आरोप हे निराधार व बिनबुडाचे होते:- सरपंच करुणा उराडे
माझ्यावर लावलेले आरोप हे निराधार व बिनबुडाचे असून सूडबुद्धीने लावलेले हे आरोप आहेत. याची जाणीव मलाच नाही तर नागरिकांनाही असल्यामुळेच नागरिकांनी माझ्या पाठीशी उभे राहत हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून मला पुन्हा एकदा सरपंचपद मिळवून दिले. त्यामुळे बेंबाळ येथील नागरिकांचे पुनश्च आभार मानते असे मत यावेळी सरपंच करुणा उराडे यांनी व्यक्त केले. #Proposal