पैनगंगा रेती चोरी प्रकरणी तहसीदारावर अदखलपात्र गुन्हा नोंदवा; पोलीसात तक्रार दाखल. #Police

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
गडचांदूर:- कोरपना तालुक्यातील तामसी रिठ पैनगंगा रेती घाटावरून लाखोंची रेती चोरीला गेली असून याला जबाबदार तहसीलदार कोरपना हे जबाबदार असल्याचे आरोप करत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार मराठा सिमेंट कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा समाजसेवक विजय ठाकरे यांनी २६ आगस्ट रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. तहसीलदारावर गुन्ह्याची नोंद न झाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार असे मत विजय ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.यामुळे कोरपना तहसीलदार विरुद्ध विजय ठाकरे युद्ध पेटणायाची चिन्हे दिसत असून तहसीलदारांना रेती प्रकरण भोवणार की काय अशी चर्चा सर्वसामान्यात सुरू आहे.#Adharnewsnetwork
      ठाकरे यांच्या तक्रारीवरून सविस्तर असे की,मौजा तामसी रीठ पैनगंगा रेती घाट गट क्रं.१६.,१९,२२,२३ व २६ आराजी ०१ हेक्टर उपलब्ध रेती साठा(अंदाजे १७६६ ब्रॉस)याप्रमाणे या रेतीघाटाचा लीलाव झाला.परंतू प्रत्यक्षात येथे मंजूर लीजच्या प्रमाणापेक्षा ५ पट जास्त रेतीचा उपसा झाला आहे.नियमानुसार ३ जानेवारी २०१८ चे महाराष्ट्र राज्य शासन निर्णय क्रमांक गौण खनीज १०/०६१५/प्र.क्रं.२८९/ख अनुसार ज्या-ज्या तालुक्यात रेतीघाट लीज दिल्या जाते त्या-त्या तालुक्यातील तहसीलदर हे मुख्य नियंत्रण व पडताळणी अधिकारी राहतात.रेतीघाट लिजधारकांचा रेती उपसा व साठवणूक हे दोन्ही ठिकाण दर १५ दिवसाला तपासणी करणे,रेतीघाट व साठवणूक कलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेराची फुटेज जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करणे व अनियमितता आढळून आल्यास ३ पट दंडाची कार्यवाही करणे कायद्याने बंधनकारक आहे.असा शासन निर्णय आहे.
      परंतू या रेतीघाटावर असे काही झाले नाही.कोरपना तहसीलदार यांनी लिजधारकाडून स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला व करोडोंची रेती चोरट्यांनी खुल्या बाजारात व में आर.के चव्हाण (तळोधी प्लांट)या कंपनीला विकली.त्याचे मौका चित्रीकरण मी(ठाकरे)आणि पर्यावरण संरक्षण संस्था चंद्रपूर यांनी केले. या घाटावरून झालेली रेतीची तस्करी याला तहसीलदार कोरपना हे जबाबदार आहेत. त्यात शासनाचा महसूल व पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.या रेती घाटावरून जास्त उपसा झाल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.त्याहुनही अधिक जलचर प्राण्यांची जीवितहानी झालेली आहे.
      या पैनगंगा रेती घाटावरील रेती चोरीचे मुख्य सुत्रधार तहसीलदार कोरपना असून भ्रष्ट मार्गाने त्यांनी या रेती घाटावरून अमाप पैसा जमवला आहे.त्यांच्या या भ्रष्ट नितीमुळे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडाला आहे.शासन निर्णय ३ जानेवारी २०१८ च्या अटी आणि शर्ती नुसार तहसीलदार कोरपना यांची सखोल चौकशी करावी व त्यांच्या विरूद्ध भारतीय दंड संहितेचे कलम,नियम,उपनियम व अटी शर्तीनुसार कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदार विजय ठाकरे यांनी ठाणेदारांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे.पोलीसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.आता यासंदर्भात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #Police