जिल्ह्यात मस्कऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू. #Section36

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शुक्रवार दि. 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मस्कऱ्या गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 23 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून दि. 5 ऑक्टोंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व त्याच्यांपेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.
हे आहेत अधिकार.....

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजा स्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर
वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.
सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 23 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन दि. 5 ऑक्टोंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील.