कुटूंबाला केंद्रबिंदू ठेवून ग्रामपंचायत स्तरावर लेबर समृद्धी बजेट. #Pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्ध लेबर बजेट तयार करण्यात आले असून शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना समृद्ध करण्याचे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत पुर्ण करण्यात येणार आहे. गावात होणाऱ्या ग्रामसभेत सदर योजनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी हे तत्त्व अंगीकारत ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व अन्य सामान्य जनता त्यांचे जीवनमान उंचावणे ,गरिबी दूर करणे व शेतकरी शेतमजूर कुटुंबीयांना लखपती करण्यासाठी शरद पवार ग्राम समृध्दी योजना महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवकांना , मजूरांना व शेतकरी कुटुंबीयांना शेतीपुरक जोडधंदे करता येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक गरिब कुटुंबीयांना वैयक्तिक कामाच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार येणार आहे. त्याप्रमाणे कामाचे अभावी होणारे स्थलांतर या सर्वाच्या अनुषंगाने प्रमाण संतुलित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या बाबींचे नियोजन करून ही योजना राबवली जाणार आहे.
वार्षिक कृती आराखड्यामध्ये शिवार फेरी,तांडा फेरी,कुटुंब समृद्धीसाठी सर्वेक्षण, समृद्ध गावासाठी ग्रामसभा घेणे, वैयक्तिक लाभाची कामे देण्याकरिता घरोघरी जाऊन प्रारूप यादी तयार करणे आदी विषय आराखड्यामध्ये अंतर्भूत राहाणार आहे. या योजनेमुळे गरीबांना लखपती होऊन आपले जीवन समृद्ध करता येईल.