Top News

डॉ. प्रशांत बोकारे गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू #Gadchiroli #Chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- डॉ. प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी, ओ. पी. जिंदाल विद्यापीठ, रायगड येथील स्कुल ऑफ इंजिनिअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेल्या डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
7 सप्टेंबर 2020 रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. मध्यंतरी डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी रूजू होण्यास नकार दिल्याने पुन्हा कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबवली गेली. दरम्यान, रामटेक येथील कवि कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आयआयटी गुवाहाटी येथून आचार्य पदवी प्राप्त केली. त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे.
डॉ. बोकारे यांनी, सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय येथे तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालय येथील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू राय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. प्रशांत बोकारे यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने