उमरी पोतद्दार पोलिसांची कार्यवाही
पोंभुर्णा:- परवाण्याची दारू दुकाने तर सुरू झाली, परंतु तालुक्यातील अवैद्य दारूविक्रीची दुकानदारी जैसे थे सुरू आहे. पोंभूर्णा तालुक्यातील अनेक गावात राजरोसपणे अवैद्य दारूविक्री धुमधडाक्यात सुरू आहे. त्याचाच एक छोटासा नमुना म्हणून आज उमरी पोतद्दार पोलिस स्टेशन हद्दीतील सातारा कोमटी येथे असलेल्या मोबाईल टॉवरच्या आपरेटर रूममधून अवैध देशी दारूच्या ९ पेट्या व थैलीतील १९ नग पव्वे पोलिसांनी धाड टाकून हस्तगत केले आहे. विक्री करणारा दारू विक्रेता फरार आहे. विकास ठाकरे असे अवैध दारू विक्रेत्याचे नाव आहे.
काही दिवसांपासून सातारा कोमटी व परिसरात विकास ठाकरे हा अवैध दारू विक्री करीत असल्याची खबर होती. पोलिस त्याच्या मागावर होते. दि.२९ डिसेंबर बुधवारला उमरी पोतद्दार पोलिसांना सातारा कोमटी येथे दारू विक्री होत असल्याची व अवैध दारूच्या पेट्या मोबाईल टॉवरच्या आपरेटर रूममधे लपवून ठेवले असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच पोलिसाची टिम घटना स्थळी पोहचून गावचे पोलिस पाटील व गावातील महिलांच्या समक्ष मोबाईल टॉवरच्या परिसराची झाडाझडती घेतली असता एका थैलीत १९ नग देशी दारूचे पव्वे व ऑपरेटर रूममध्ये देशी दारूच्या ९ पेट्या असा एकूण ४५ हजार नवशे पन्नास रूपये किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. मात्र अवैध दारू विक्रेता पोलिसांच्या हाती लागला नाही. दारू विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून. पुढील तपास ठाणेदार निलकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.