जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दुहेरी हत्याकांडातील पसार जावई-सासऱ्यास अटक #arrested

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- घुग्घुस पोलिस ठाणे हद्दीतील ताडाळी टी पाईंट येथील धाब्यावर काम करीत असलेल्या कामगाराने पगार मागितल्याच्या कारणावरून कामगार व त्याच्या पत्नीस चाकू हल्ला करून ठार केले. या दुहेरी हत्याकांडात ते नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असताना रजेवर आले आणि पसार झाले. या पसार आरोपी जावई-सासर्‍यास तब्बल 9 वर्षानंतर आदिलाबाद येथून अटक करण्यात आली.
ही कारवाई शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नागो रेडलावार, सुनील साखरकर असे अटकेतील जावई-सासर्‍याचे नाव असून, चंदू कांबळे व शहनाज असे मृतक पती-पत्नीची नावे आहेत. आरोपी रेडलावार यांचा ताडाळी टी पाईंट येथे धाबा होता. तर, लगतच सुनील साखरकर यांचा हातठेला होता. मृतक चंदू कांबळे आपल्या कुटुंबासह धाब्यावर काम करून तिथेच वास्तव्यास राहायचा. 17 ऑगस्ट 2011 रोजी मृतकाने कामाचा मोबदला मागितला. त्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, आरोपी रेडलावार याने चाकूने मृतकावर हल्ला केला. पतीला वाचविण्यासाठी पत्नी धावून आली असता, तिच्यावरही चाकुने हल्ला करण्यात आला.
या प्राणघातक हल्लयात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. आरोपींविरूद्ध भादंवी 302, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. ते नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होते. 4 मे 2013 रोजी 15 दिवसांसाठी रजेवर आले होते. त्यानंतर ते पसार झाले. या पसार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदिलाबाद जिल्ह्यातील पुनाळा येथून अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक बाळासाहेब खाडे,उपनिरिक्षक संदीप कापडे, राजेंद्र खनके, सुरेंद्र महतो, गणेश मोहुर्ले, विनोद जाधव यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत