अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या! #Chandrapur

Bhairav Diwase
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
चंद्रपूर:- ९, १० जानेवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांत जोरदार तर काही तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील कापूस, हरभरा, गहु, तूर, वाटाणा, मक्का, लाखोळी, उडीद, मुंग, मिरची व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नव्याने आलेल्या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी, भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजपाचे चंद्रपूर तालुका महामंत्री विजय आगरे, पोंभुर्णा पं. स. सदस्य विनोद देशमुख, भिमणीचे उपसरपंच रंजीत पिंपळशेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.