Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती द्या:- सुधीर मुनगंटीवार

विधान भवनात घेतली अधिकाऱ्यांसह आढावा बैठक
मुंबई:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या रस्ते व पुलांच्या बांधकामाचा आढावा लोकलेखा समितीचे अध्यक्ष व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानभवन येथील दालनात घेतला.
जिल्हयातील अपूर्ण व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी अशी आग्रही मागणी श्री मुनगंटीवार यानी या बैठकीत केली. मजबूत व प्रशस्त रस्ते ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. निधी अभावी कामे रखडली जावू नयेत अशी विनंती करतानाच चंद्रपूर हा आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गावांशी जोडला गेलेला जिल्हा असल्याने येथील विकास कामे प्राधान्याने आणि गतिने व्हावीत अशी अपेक्षा श्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत व्यक्त केली.
दाताळा पुलाचे आकर्षक सौंदर्यीकरण

चंद्रपूर शहरालगत आसलेल्या दाताळा पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी सूचना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूरकराना ती अनोखी भेट ठरावी, या दृष्टीने जागतिक स्तरावरील उच्चतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा "रामसेतू" सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल त्यादृष्टीने प्रयत्न करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस.एस साळुंखे, पी. डी. नवघरे, चंद्रपूर सा. बां. विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती एस.एस. साखरवडे, मुख्य अभियंता ए. आर. भास्करवार, श्री. पाटील, सचिन चिवटे,पी. डी. लहाने आदी अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने