Top News

मार्कंडा यात्रा रद्द केल्याच्या विरोधात उद्या मार्कंडा देवस्थानच्या प्रवेशद्वारावर आंदोलन #gadchiroli


यात्रेला मंजुरी दिली नाही तरी भाविक कोणत्याही परिस्थितीत यात्रा भरवतील:- आ. डॉ. देवराव होळी
गडचिरोली:- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व विदर्भाची काशी म्हणून गौरवान्वित असलेल्या मार्कंडा देवस्थान आणि चपराळा येथील महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून भाविकांच्या वतीने या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात मार्कंडा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर उद्या दिनांक २८ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता आंदोलन करणार असल्याची घोषणा आ. डॉ. देवराव होळी यांनी केली असून या आंदोलनात भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शासनाने यात्रेला मंजुरी दिली नाही तरी यात्रा कोणत्याही परिस्थितीत भाविक भरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा:- गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा, चपराळा यात्रा रद्द

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ही सुरुवातीपासूनच मंदिरांवरील कार्यक्रमांवर आघात करीत आहे. कोरोना नियमांचे पालन करीत यात्रा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली असताना अचानक ती परवानगी रद्द करणे म्हणजे जिल्ह्यातीलच नव्हे विदर्भातील लाखो भाविकांच्या आस्थेचा अपमान करण्याचा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जनता प्रचंड दुखावली असून मागील २ वर्षापासून मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना या वर्षीही दर्शन करून न देण्याचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
एकीकडे मोठमोठ्या सभांना, कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे, मात्र दुसरीकडे मंदिर व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले जात आहेत. शासनाने यात्रेला लवकरात लवकर मंजुरी द्यावी याकरिता मोठे आंदोलन केले जाईल. तसेच याविरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आपण सरकारला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
   मार्कंडा देवस्थान येथे उद्या सकाळी ११ वा. होणाऱ्या आंदोलनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने