Top News

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; तीन जण ठार #death

कोरची : कोरची मुख्यालयापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देवरी (जि.गाेंदिया) कडून येत असलेली दुचाकी आणि समोरून येणारी दुसरी दुचाकी यांच्यात जबर धडक झाली.
यात दोन्ही दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला फेकल्या जाऊन तिघांना प्राण गमवावे लागले. या अपघातात दाेघे जण गंभीर जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, देवरी येथून बेळगावकडे जात असलेल्या दुचाकीवरून (एमएच २५, झेड ४३६७) तिघे जण प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकीची समोरून येत असलेल्या दुचाकीला (सीजी ०४, एलआर ३२९५) जबर धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले.
या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काेरची या तिघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर तुळशीराम कवास, रा. रेंगेपार जि. गाेंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा.दोडके हे गंभीर जखमी आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत काेरची ग्रामीण रूग्णालयात आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. पण पुढील उपचार मिळण्यापूर्वीच दाेघांचा मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका पाठविण्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला; परंतु रुग्णवाहिका गडचिरोली आणि चंद्रपूरला गेली असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी स्वतःची गाडी घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास मदत केली.
दरम्यान, नगरसेवक गुड्डू अग्रवाल यांनीसुद्धा आपल्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
घटनास्थळी तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने