शोभायात्रेदरम्यान रामभक्तांनी केलेल्या 'जय "श्रीराम"च्या जयघोषाने चंद्रपूर शहर दुमदुमले
चंद्रपूर:- श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही, किंबहुना पूर्वीपेक्षा थोड्या जास्तच उत्साहात रविवारी सायंकाळी चंद्रपूर शहरात भव्यदीव्य शोभायात्रा निघाली. चंद्रपुरातील समाधी वॉर्ड परिसरातील काळाराम मंदिरातून शोभायात्रेदरम्यान रामभक्तांनी केलेल्या 'जय "श्रीराम"च्या जयघोषाने चंद्रपूर शहर दुमदुमले होते. विविध देखाव्यांनी नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
रामनवमीच्या शोभायात्रेच्या अग्रपूजेचा मान यावर्षी कुंभार समाजाला देण्यात आला. कुंभार समाजाचे विभागीय अध्यक्ष अजय मार्कंडेवार यांनी सपत्नीक आपल्या समाजाच्या पदाधिकार्यांसह काळाराम मंदिर येथे श्रीरामाचे पूजन केले. त्यानंतर यात्रेला सुरूवात करण्यात आली. ठिकठिकाणी घरांसमारे व मार्गावर काढलेल्या रांगोळ्या, भगवे ध्वज, ध्वनीक्षेपकावरील भजनाने चंद्रपूर शहर राममय झाले होते. यावर्षी रामभक्तांना पूजन करणे सोयीचे व्हावे यासाठी श्रीरामाचा रथ बँड पथकासह समोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर भजन मंडळासह, विविध पंथ, संप्रदाय, समाजाचे महिला, पुरुष आपल्या पारंपारिक गणवेशात सहभागी झाले होते. शोभायात्रा गांधी चौकात पोहचल्यानंतर विविध देखावे यात सहभागी झालेत.
युवक, युवतींचे ढोल तसेच संदल पथक यावर्षीच्या श्री राम शोभायात्रचे विशेष आकर्षण होते. यासह उत्कृष्ट महिला मंच, महाकाली देवस्थान, सिंधी समाज, तेली समाज यांनी सादर केलेले देखावे लक्ष वेधून घेत होते. जटपूरा गेट येथे चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातर्फे मनमोहक सजावट करण्यात आली होती. गंजवार्ड येथे गंजवार्ड मित्र मंडळतर्फे रामायणातील प्रसंग सांगणारे स्थळ देखावे तयार करण्यात आले होते. महानगराच्या गांधी चौक व कस्तुरबा या दोन्ही मार्गावर रामभक्तांच्या स्वागतसाठी ठिकठिकाणी स्वागतद्वार व मोठमोठे स्वागत फलक व भगवे ध्वज लावण्यात आले होते. तसेच विविध समाज मंडळ व गणेश मंडळाने शोभायात्रेचे पूजन करून रामभक्तांना प्रसाद व जल वितरण केले.
शोभायात्रेदरम्यान रुग्णवाहिकाना पोलिस प्रशासन व रामभक्तांनी खुला करून दिला रोड....