Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मित्रांनीच केला मित्राचा खून #murder



शेंदुरजणे, (ता. वाई) येथे एका कामगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांनी दारूच्या नशेत सहकारी मित्राचा खून केल्याची कबुली दिली आहे.

भानुदास मारुती शेंडे (वय 35, मूळ राहणार पारडीठवरे ता.नागभीड जि.चंद्रपूर), असे निर्घृण हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे.तर मनोज संगेल, प्रफुल्ल चेन्नकार (दोघे रा. तोलोदी ता. नागभीड जि. चंद्रपूर) व जितेंद्र नेवारे (रा. नावेगावहूंडेश्‍वरी ता. नागभीड जि. चंद्रपूर), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत वाई पोलिस ठाणे व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार मयत भानुदास शेंडे हा गेल्या दोन वर्षापासून शेदूरजणे येथील एका खाजगी कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो रोज दारू पिऊन सहकार्‍यांना शिवीगाळ करणे, भांडण करणे अशा गोष्टी करायचा.

यातच शुक्रवार दि. 8 रोजी कामावरून सुटल्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भानुदास शेंडे हा दारू पिऊन आल्याने नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर एकत्रित राहण्यास असणारे त्याचे सहकारी मनोज संगेल, प्रफुल्ल चेन्नकार, जितेंद्र नेवारे यांच्याशी भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून या तिघा संशयितांनी भानुदास शेंडे याला लाकडी दांडके, लोखंडी पाईप व पायातील बुटांनी मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना कंपनीचे सिक्युरिटी गार्ड शंकर यादव यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

कंपनी प्रशासनाने तात्काळ वाई पोलीस स्टेशनशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी आपल्या सहकार्‍यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वाई पोलिसांना तिघा संशयितांना अटक केली असून संशयितांनी भानुदास शेंडे यांचा खून केल्याची कबुली दिली. फिर्याद सिक्युरिटी गार्ड शंकर यादव यांनी दिली. तपास सपोनि रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत