परकोटाच्या संरक्षक भिंतीचे कठडे चोरीला! #Chandrapur

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- शहरातील गोंडकालीन किल्ला परकोटाच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या संरक्षक भितींचे लोखंडी कठडे चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात इको-प्रोच्या माध्यमातून घटनास्थळाची पाहणी करून संरक्षण भिंती व कठड्याची सुरक्षा करण्याची तसेच चोरी करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
चंद्रपूर शहराला गोंडकालीन इतिहासाचे वैभव लाभले आहे. गोंड राजांनी चंद्रपूरच्या संरक्षणासाठी परकोट बांधला. मात्र, काळाच्या ओघात हे परकोट तुटले होते. ही बाब लक्षात घेऊन इको प्रोने 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत किल्ला स्वच्छता अभियान राबवले. त्याची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून घेतली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून किल्ला परकोटाच्या संरक्षणासाठी या भिंतीच्या दोन्ही बाजूस आतून बाहेरुन 11 किलोमीटर लांब संरक्षण भिंत, त्यास लोखंडी कठडे लावण्याचे काम सुरु करण्यात आले. कोरोना पूर्वी 8 किलोमीटरपर्यंत या भिंतीचे काम पूर्ण झाले. मात्र, कोरोनामुळे यात खंड पडला. या दोन्ही भिंतीमधून पादचारी आणि सायकल ट्रॅक प्रस्तावित आहे. मात्र, संरक्षक भिंतीचे लोखंडी कठडे आता चोरी जाऊ लागले आहे.
मागील दीड-दोन महिन्यात पठाणपुरा गेट ते विठोबा खिडकी आणि पुढे बिनबा गेटपर्यंत संरक्षक भिंतीच्या लोखंडी कठडे चोरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी लोखंडी कठडे उखडून काढण्यासाठी सिमेंटचे काँक्रिट देखील तोडण्यात आले आहे. मात्र शुक्रवारी विठोबा खिडकी ते बिनबा गेट दरम्यान अनेक कठडे चोरी गेल्याची माहिती कळताच इको-प्रोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी करीत कठड्याची सुरक्षा व चोरी करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला माहिती दिली असून, आणि यापूर्वीच पुरातत्व विभागने पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतरही काही ठिकाणी कठडे चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर धोत्रे यांनी कार्यकर्त्यांसह येथे भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन ऐतिहासिक वास्तू, भिंतीच्या संरक्षणासाठी मागणी करण्यात येणार आहे.
आपला ऐतिहासिक वारसा, जतन-संवर्धन करण्यास सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपला ऐतिहासिक वारसा ही राष्ट्राची संपत्ती असून, त्याची नासधूस करणे कायद्याने गुन्हा आहे. चोरी झालेल्या कठड्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिस विभाग किंवा इको-प्रोला माहिती द्यावी, असे आवाहन धोतरे यांनी केले आहे.