उपोषण स्थगित करण्याची विनंती
नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच लोकार्पण करण्याचे लेखी आश्वासन
तारीख अथवा महिना जाहीर केल्याशिवाय उपोषण स्थगित करणार नाही असा रत्नाकर चटप यांचा निर्धार
आरोग्य अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- जिल्हा परिषद चंद्रपूरचे आरोग्य अधिकारी यांनी नांदा गावाचे माजी ग्रामपंचयत सदस्य तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप यांच्या आमरण उपोषण आंदोलनाची दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याने लेखी पत्र पाठवून उपोषण स्थगित करण्याची विनंती त्यांना केली आहे.
नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करावे असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून लवकरच आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल, तरी आपण उपोषण मागे घ्यावे असे आरोग्य अधिकारी यांनी रत्नाकर चटप यांनी लेखी पत्रात म्हटले आहे.
हे आंदोलन जाहीर केल्याचे यश असून प्रशासनाने लोकार्पणाबाबतची तारीख अथवा महिना जाहीर करावा म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेणार आहे. ठोस आश्वासनाशिवाय उपोषण स्थगित करणार नाही. नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू होण्यासाठी विविध सामाजिक संघटना व पंचक्रोशितील नागरीक जाहीर केलेल्या उपोषणास पाठींबा देत असून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया रत्नाकर चटप यांनी घेतली.
विशेष म्हणजे मंत्रालयातील आरोग्य विभागाशी देखील रत्नाकर चटप यांचा पत्रव्यवहार सुरू आहे. नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाची होणाऱ्या बैठकीतून काय निष्पन्न होईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.