🌄 💻

💻

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते बक्षीस #Gadchiroli


गडचिरोली:- नक्षल्यांच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या ६३ वर्षीय नक्षलीसह एका ३४ वर्षीय महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. हे दोघेही वेगवेगळ्या दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर प्रत्येकी ६ लाखांचे इनाम राज्य शासनाने ठेवले होते.
रामसिंग उर्फ सीताराम बक्का आत्राम (६३ वर्षे) आणि माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी (३४ वर्षे) अशी या दोन आत्मसमर्पितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांनी पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंढे प्रामुख्याने उपस्थित होते. या दोघांनाही आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या हुद्यानुसार प्रत्येकी ४.५ लाख रुपये रोख, घरकूल आणि रोजगार-स्वयंरोजगारासाठी पोलिसांकडून मदत केली जाणार आहे.
रामसिंग हा मूळचा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी आहे. मार्च २००५ ला तो अहेरी दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर पेरमिली दलम आणि २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. नक्षल्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम तो करत होता. त्याच्यावर एक खून, एक चकमक व इतर १ असे ३ गुन्हे आहेत.
तर, माधुरी ऊर्फ भुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळची रहिवासी आहे. नोव्हेंबर २००२ ला ती कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. त्यानंतर भामरागड दलम आणि फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर खुनाचे ४ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचे ७ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत