*जनसुनावणीत प्रशासन व कंपनीने शेतक-यांच्या हिताची बाजु मांडली नाही*
भद्रावती,दि.२५(तालुका प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अरविंदो रियल्टी ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (ए.आर.आय.पी.एल) कंपनी व प्रशासनाने शेतकरी हिताची बाजू मांडलीच नाही असा आरोप करत पर्यावरणाचा समतोल राखाल तरच प्रकल्प शक्य असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी व्यक्त केले.
भद्रावती तालुक्यातील पानवडाळा, टाकळी, बेलोरा, जेना, निवली, किलोनी, अस्थि रिठ, गोटाळा रिठ, गोवरदिप रिठ, खंडाळा रिठ, डोंगरगांव खडी, सोननाळा, या गावातील शेतक-यांची जमिन खुली व भूमिगत खाणीसाठी संपादीत करण्यात आली आहेे.
टाकळी जेना बेलोरा उत्तर/दक्षिण खुली भूमिगत कोळसा खाणीसाठी जमिनी अधिग्रहित होत असून त्या गावांत सामाजिक ,आर्थिक, रोजगार व पर्यावरण विषय समस्या निर्माण होत असल्याचे विजय पिदुरकर यांनी जनसुनावनीत कंपनी व प्रशासनाला सागितले.
अरविंदो कंपनीने ९३६ हे.आर. जमिन भूमिगत व खुल्या खाणीकरीता अधिग्रहित केलेली आहे. त्या अनुषंगाने कंपनी जमिनीचा भाव, रोजगार, पुनर्वसन कोणत्या कायद्या अंतर्गत देणार आहे असा सवाल पिदुरकर यांनी केला.
जनसुनावणीत कंपनीने स्थानिक शिक्षित बेरोजगार युवक व युवतींना शिक्षणानुसार व योग्यतेनुसार नोकरीत समावून घेण्याची मागणी यावेळी केली. तसेच शेतकरी व बारा बलुतेदार यांना कंपनीत सामावून घेण्याची कोणती योजना आहे याविषयी कंपनीला जनसुनावणीत विचारणा केली आहे.
कोळसा उत्खनन व वाहतुकीमुळे होणा-या प्रदुषणाने शेतपीक, पशुचारा, पशुधन, शेतकरी, शेतमजुर, रस्त्यावरील गावांना प्रदुषणामुळे दुष्पपरिणाम होत असून कंपनीने यावर कोणती उपाय योजना केलेली आहे याकडे पिदुरकर यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
सीएसआर निधी, स्थानिकांना रोजगार, नैसर्गिक नाला परावर्तीत करतांना होणा-या शेत मालाचे नुकसान तसेच शेतकरी हिताचे मुद्दे जनसुनावणीत उपस्थित करून सर्व शेतकरी बांधवांचे पिदुरकर यांनी लक्ष वेधले.
यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे, भाजपा वणी तालुका अध्यक्ष गजानन विधाते, प्रशासन व कंपनीचे प्रतिनिधी, सरपंच व अधिग्रहित जमिनीचे शेतकरी उपस्थित होते.