दोन तासात सुटला शेकडो गावातील पथदिव्यांचा प्रश्न
चंद्रपूर - मागील पंधरा दिवसांपासून अंधारात असलेली गावे खासदार बाळू धानोरकरांच्या स्टाईलने पुन्हा उजळली. देयक न भरल्यामुळे पथदिव्यांची वीज कापली होती. त्यामुळे गावकरी प्रचंड त्रस्त झाले होते. सरपंच संघटनांनी हा प्रश्न खासदार धानोरकरांकडे नेला. त्यांनी तो दोन तासात सोडविला. त्यामुळे भद्रावती-वरोरा मतदार संघातील शेकडो गावांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गावातील रस्त्यावर पुन्हा प्रकाश पडायला लागला.
ग्रामपंचायतने पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून वीज वितरण कंपनीने पथदिव्यांची वीज कपात केली. भद्रावती-वरोरा मतदार संघातील बहुतांश गावे जंगलव्याप्त आहे. त्यामुळे हिंस्त्र श्वापदांचा नेहमीच येथे वावर असतो. अनेकदा ते गावात येतात. पाळीव जनावरं माणसांना लक्ष करतात. तसेच सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. त्यामुळे पथदिव्यांचा वीज कापू नये, अशी विनंती भद्रावती-वरोरा मतदार संघातील शेकडो ग्रामपंचायतीनी वीज वितरण कंपनीकडे केली.
देयक अदा करण्यासाठी मुदत वाढ द्या, अशी मागणी केली. दोन वर्ष कोरोनामुळे कर जमा झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती चांगली नाही, असेही त्यांनी वीज वितरण कंपनीला सांगून बघितले. परंतु ते ऐकण्याच्या मानसिकेत नव्हते. त्यामुळे सरपंच संघटनेने गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले. दरम्यान खासदार धानोरकर यांची सरपंच संघटनेची काल शुक्रवारला भेट घेतली. त्यानंतर स्वतः खासदार बाळू धानोरकर वीज वितरणच्या कार्यालयात पोहचले. थकीत वीज देयक अदा करण्यासाठी ग्रामपंचायला वेळ द्या, अशी विनंती त्यांनी केली. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी एकायला तयार नव्हते. त्यामुळे धानोरकरांना संताप अनावर झाला. शेकडो गाव अंधारात असताना अधिकाऱ्यांची बेपर्वाईने त्यांचा संयम सुटला. शेवटी त्यांनी धानोरकर स्टाईल वापरली. जोपर्यंत पथदिव्यांचा प्रश्न सुटणार नाही. तोपर्यंत एकाही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला कार्यालयाबाहेर बाहेर जावू देणार नाही, असा दम दिला. दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर मिताली शेट्टी यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली. तेव्हा नितीन राऊत यांनी पथदिव्यांची वीज कापला जाणार नाही, असे आश्वास खासदार धानोरकरांना दिले. मात्र त्याने खासदारांचे समाधान झाले नाही.
शेवटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लेखी आदेश पाठविले. पुढील निर्देश येईपर्यंत वीज कापू नये. ग्रामपंचायतला देयक अदा करण्यासाठी वेळ द्या, असे लेखी आदेश त्यांना अधिकाऱ्यंाना दिले. त्यानंतर धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना कार्यालय बाहेर जावू दिले. त्यानंतर सरपंच संघटनेने उपोषण मागे घेतले. धानोरकरांच्या स्टाईलने शेतकरी वीज कपातीच्या जाचातून मुक्त झाले. गावा पुन्हा उजळल्याने गावकरी समाधानी झाले.
शेतीचा हंगाम सुरु आहे. रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. हिेंस्त्रप्राणी गावापर्यंत पोहचलेले आहे. अशा परिस्थितीत पथदिव्यांची वीज कापणे योग्य नाही. ग्रामपंचायती वीज देयक अदा करण्यासाठी वेळ द्यायला हवा. आमच्या शेतकऱ्यांवर वीज वितरण कंपनीचा विश्वास नाही काय, हे समाजावून सांगण्यासाठी मला आपली स्टाईल वापरावी लागली आणि दोन तासास प्रश्न निकाली निघाला.खासदार बाळू धानोरकर