Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जणू देवदूतच आले तिच्यासाठी धावून! #angels #running


मध्यरात्री पार पाडले रेस्क्यू ऑपरेशन
चंद्रपूर:- बल्लारपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या हडस्ती, चारवट गावाला पुन्हा पुराने वेढले. वर्धा नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केल्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन तिथे राहावे लागत आहे. मंगळवारी गावातील एक महिला शीला रतन रॉय (वय ३२) ही गंभीर आजारी झाली. तिला तत्काळ उपचाराची गरज होती. ही माहिती बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांना मिळताच त्यांनी मध्यरात्री नांदगाव (पोडे) येथून चारवटमार्गे मोटर बोटद्वारे रेस्क्यू ऑपरेशन हाताळून तिला नांदगाव येथे आणले. नंतर रुग्णवाहिकेने नांदगावमार्गे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून तिचा जीव वाचविला. संपूर्ण रेस्क्यू टीम तिच्यासाठी जणू देवदूतच ठरली.
हडस्ती, चारवट, जुना चारवट या गावांना १८ जुलैपासूनच इरई, वर्धा नदीचे पुराचा वेढा असल्याने दोन्ही गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे; परंतु संबंधित प्रशासन संपर्कात असल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळत आहे. मौजा हडस्ती येथील शीला रॉय या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. तिला तत्काळ उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल कसे करायचे, हा मोठा प्रश्न होता.
घेण्यात आली डोंग्याची मदत

तहसीलदार राईंचवार यांना याबाबतत कळविल्यानंतर लगेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांना नांदगाव येथे बोलावले. लगेच १०८ रुग्णवाहिकासुद्धा तयार ठेवण्यात आली. एव्हाना बरीच रात्र होऊन गेली होती. तरीही रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली; परंतु पुरात मार्ग सापडत नसल्याने गावातील संबा मेश्राम, महादेव मेश्राम व तिच्या नातेवाइकांनी धैर्य दाखवून डोंग्याच्या साह्याने महिलेला चारवटपर्यंत आणले व अखेर रात्री १ वाजता तिथून रेस्क्यू टीमच्या मोटर बोटने नांदगाव पोडे येथे आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दखल करण्यात आले. यासाठी बोटचालक राजू निंबाळकर व सहकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक जितेंद्र सुरवाडे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत