चंद्रपूर:- गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राजुरा तालुक्यातील अनेक गावांतील शेती पुराच्या पाण्याखाली आली असून, गावागावांतील ओढ्यांना सर्वत्र पूर आला आहे. अशातच राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी बस अडकली व ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला. यावेळी विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा:- 35 प्रवाशांसाठी पोलीस बनले "देवदूत"
महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेलगत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुलावर पाणी वाहत होते. मध्यप्रदेशातून येणारी ही ट्रॅव्हल्स हैदराबादकडे जात होती. बुधवारी सकाळीच पोलिसांनी हा मार्ग पूर्णपणे बंद केला होता; परंतु ट्रॅव्हल्सच्या चालकाने सूचनेकडे दुर्लक्ष करून बस पाण्यात घातली. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बस नाल्यातच अडकली. त्यामुळे प्रवासी जिवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी विरूर पोलिसांना माहिती देताच. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विरुर पोलीस ठाण्याच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्त्वात अंधारातच बचावकार्य सुरु केलं.
अडकलेल्या ३५ प्रवाशांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक होती. त्यामुळे आधी मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इतर प्रवाशांनाही विरूर पोलिसांच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून जीवाची पर्वा न करता ३५ प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चंद्रपूर पोलिसांच्या साहसी कामगिरीचे कौतुक होत आहे.
हेही वाचा:- पुरात अडकलेल्या 22 ट्रक चालकांची सुटका
माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही ट्विट करून विरूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
'पोलीस म्हणू की जनतेच्या हाकेला धावून आलेला देवदूत! विरुर पोलीसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेलं मदतकार्य अभिमानास्पद बाब आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली नाला इथे बस बंद पडल्याने ३५ प्रवाशी पुरात अडकले. पण स्थानिक पोलिसांनी पुरात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सलाम ह्या वीरांच्या कार्याला!.. असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले.