लर्निंग लायसंस व कामगार वर्गासाठी श्रमिक कार्ड शिबिराचे आयोजन
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३० जुलैला राहुल पावडे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य मॅरेथॉन व विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थानिक रघुनंदन लाॅन येथे केक कापून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाला सुरूवात झाली. तत्पूर्वी सकाळी विदर्भ हाऊसिंग चौक येथून मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. विदर्भ हाउसिंग चौक ते महात्मा फुले चौक व महसूल पुलिया ते सद्गुरु मेडिकल ते पुन्हा विदर्भ हाऊसिंग चौक येथे या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे मिळून महिला व पुरुष विभागवार प्रत्येकी पाच पारितोषिक देण्यात आले. तसेच वैयक्तिक बक्षीसे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
दरम्यान रघुनंदन लाॅन येथे लर्निंग लायसंस व कामगार वर्गासाठी श्रमिक कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लर्निंग लायसंस बनवून घेतले, कामगार वर्गासाठी कामगाराच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या याकरिता कामगारांनी सुद्धा आपले श्रमिक कार्ड बनवून घेतले. सर्व वयोगटातील नागरिकांना सुलभरित्या आधार अपडेट करण्याकरीता शिबिर घेण्यात आले. यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागू नये, व आवश्यक या कागदपत्रांची सुलभरित्या पूर्तता व्हावी, या उदात्त हेतूने नागरिकांसाठी सदर शिबिर पार पडले.
राजकारण हे समाजकारणाचे उत्तम माध्यम आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष कृतीतून उतरवत माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी यापूर्वी अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले. पूरपरिस्थिती ओढावली असताना पूरग्रस्तांना तातडीने सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मदतीचा हात दिला. अशातच आ. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ई-लर्निंग लायसंस व स्वर्चातून नागरिकांना हेल्थ कार्ड तयार करून देण्यासाठी शिबिर आयोजित केले. अनेक लोक हेल्थ कार्ड अभावी योग्य उपचारापासून वंचित राहतात. गरीब नागरिकांच्या आरोग्याची हेल्थ कार्ड अभावी हेळसांड होवू नये, यासाठी हे शिबिर घेण्यात आले. या सर्व शीबीराचा शेकडो गरजु नागरिकांनी लाभ घेतला.
दिवसभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेवून लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला वार्डातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.