Top News

भावडांना वाचविताना ११ वर्षीय बहिणीचा बुडून मृत्यू #death #Saoli #chandrapur


सावली:- शहरापासून आसोलामेंढा तलावात बहिण व भावाला वाचविताना 11 वर्षीय बहिणीचा बुडून मृत्यू झाला. तिचा मृतदेह तब्बल 7 किमी अंतरावर मिळाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून आसोलामेंढा तलावाचे नहर शहराला लागूनच गेले आहे. सध्या नहराला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नहरालगतच्या वार्डातील महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात. दि. २६ ऑगस्टला शुकवारी एक महिला कपडे धुण्यासाठी गेली होती. तिच्या मागे तिचे व अन्य अशी पाच मुले सोबत गेली होती. ती नहरावर कपडे धूत असताना त्यापैकी चार मुले नहरात आंघोळीकरीता उतरली. नहरात पाणी जास्त असल्याने व नहर खोल असल्याने त्या चारही मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ती पाण्यात बुडू लागली.
त्यामध्ये रोहीत अनिल मेडपल्लीवार ( वर्ग 7), अमित अनिल मेडपल्लीवार ( वर्ग 5 ), राहुल अंकुश मक्केवार ( वर्ग 4 ),सुश्मिता अंकुश मक्केवार ( वर्ग 8 ) यांचा समावेश होता. चारही मुले बुडत असताना 5 व्या वर्गातील काजल मक्केवार हिच्या लक्षात आले. त्यामध्ये तिच्या एका बहिण व भावाचा समावेश होता. त्यामुळे तिने त्यांना नहरातील पाण्यात उडी घेऊन वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तसेच मुले बुडत असताना प्रचंड आरडाओरड झाल्याने नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे काही नागरिक धावून आले. चारही मुलांना कसेबसे नागरिकांनी नहराबाहेर काढून त्यांचे जिव वाचविले. मात्र, भावा बहिणीला वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता नहरात उडी मारलेल्या काजलला वाचविता आले नाही. ती वाहू लागली.
बऱ्याच अंतरावर वाहून गेल्यानंतर ती दिसेनासी झाली. लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन बोटीच्या सहाय्याने काजलचा शोध घेतला. परंतु तिचा पत्ता लागला नाही. काही वेळानंतर तिचा मृतदेह तब्बल 7 किमी अंतरावर मिळाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने