Top News

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे 9 वर्षीय सार्थकचा मृत्यू #death


रात्री घराबाहेर पडला तो परतलाच नाही!
वर्धा:- अल्लीपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पाथरी येथे नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरलं होतं. या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
सदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने पाथरी गावात खळबळ उडाली आहे. सार्थक बाळकृष्ण घोडाम (०९) असे मृत बालकाचे नाव आहे. सार्थक घोडाम हा वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता.
रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची गावात शोधाशोध केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. तेवढ्यातच कुटुंबीयांना गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ नवीन इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्याजवळ सार्थकच्या चपला आढळून आला. अखेर त्याच खोदलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंगणवाडीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरलं आहे. त्याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस पाटील संजय चरडे यांनी याबाबतची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री १० वाजेच्या सुमारास सार्थकचा मृतदेह पाण्याने तुडूंब भरलल्या खड्ड्यातून बाहेर काढत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणात कंत्राटदाराचा हलगर्जीपणा दिसल्याने पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी कंत्राटदार आकाश राऊत याच्याविरुद्ध ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पाथरी गावावर शोककळा पसरली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने