चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात एक धक्कादायक हत्या प्रकरण उजेडात आले आहे. शिक्षक प्रियकराच्या मदतीने एका पत्नीने आजारी असलेल्या आपल्या पतीची हत्या केली आहे.
मनोज रासेकर असं हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहणाऱ्या मनोज रासेकर या 44 वर्षीय इसमाचा गळा आवळून हत्या झाली होती. मनोज हा टॅक्सी ड्रायव्हर असून काही अज्ञात इसमांनी घरात घुसून लुटपाट करून मनोजचा खून केला अशी पत्नीने तक्रार केली होती.
या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला आणि नंतर जे सत्य समोर आलं ते हादरवणारं होतं. पोलिसांच्या तपासात पत्नीच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे. मृत मनोजच्या पत्नीचे स्वप्निल गावंडे नामक शिक्षकाशी प्रेमसंबंध होते. यात वारंवार आजारी राहणारा पती अडसर ठरत होता.
पतीचा काटा दूर करण्यासाठी या दोघांनी मिळून कट रचला. यानुसार मनोजच्या पत्नीने रात्रीच्या सुमारास घराचे दार मोकळेच ठेवले. आरोपी शिक्षक असलेला प्रियकर घरात शिरला. त्याने उशीने तोंड दाबून मनोजचा खून केला. मात्र आरोपींनी प्लॅन "बी" वापरत घटनेला लुटीचे स्वरूप दिले. मात्र पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेत मोबाईल कॉल डिटेल्स आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक चंद्रपुरातील नामांकित शाळेत शिक्षक आहे.
सदर शिक्षक आणि मृतकाची पत्नी यांचे अनैतिक संबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये मनोज हा अडसर ठरत होता. काही दिवसांपासून मनोज हा आजारी देखील होता. त्यामुळं त्याला संपवण्याचा प्लॅन या दोघांनी आखला. त्याच्या हत्येनंतर आरोपी पत्नीनं लुटमारीनंतर हत्या झाल्याचं नाटक केलं. शिवाय स्वत: तशी तक्रारही पोलिसांमध्ये दिली.
मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि काही गुप्त माहितीच्या आधारे चौकशी केली. आपल्याच मुलीच्या शाळेतील शिक्षकाशी या महिलेचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात अडसर होत असलेल्या पतीला पत्नीनं शिक्षक प्रियकराच्या मदतीनं संपवलं पण पोलिसांनी हा बनाव 24 तासाच्या आत उघडकीस आणला.