Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अनुसूचित जमातीतील विद्यार्थी-विद्यार्थिनीं व बचत गटातील महिलांकरीता करियर व रोजगार मार्गदर्शन #chandrapur


ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल महिला शाखेचा उपक्रम
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल महिला शाखा चंद्रपूरच्यावतीने दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी अनुसूचित जमातीतील महिला बचत गटांना व विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता रोजगार व करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी, महिला ऑफ्रोट सेलच्या अध्यक्षा श्रीमती कांचन वरठी, सचिव श्रीमती ज्योती गावंडे, सरकारी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. संगीता भलावी, श्रीमती रेखा कुमरे, श्रीमती रत्नमाला धुर्वे, श्रीमती उषा कोवे, श्री. नंदकिशोर कोडापे, उद्योजक महेंद्र उईके, श्री. अंबादास ऊईके, श्री. शांताराम मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ऑफ्रोट संघटनेचे सचिव श्री. नंदकिशोर कोडापे यांनी उपस्थित महिला बचत गट, विद्यार्थी व युवक-युवतींना नोकरी, शिक्षण व इतर क्षेत्रात प्रगती कशी साधावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

सरकारी महाविद्यालय, नागपूरच्या प्रा. डॉ. संगीता भलावी यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना एमबीबीएस व्यतिरिक्त इतर पॅरामेडिकल कोर्स आहेत ज्यात चांगल्या रोजगाराची संधी आहे असे सांगून सर्व आवश्यक कोर्सची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. उद्योजक महेंद्र उईके यांनी उपस्थित बचत गटातील महिला, युवक-युवतींना छोट्या मोठ्या जवळपास 50 उद्योगांची माहिती दिली व एक चांगल्या उद्योगांचे गुण उपस्थितांना अवगत करून दिले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत महिला ऑफ्रोट सेलच्या अध्यक्षा कांचन वरठी यांनी अनुसूचित जमातीमध्ये उद्योजक निर्माण होणे खूप आवश्यक आहे. लहान मोठ्या व्यवसायात जनतेने पुढे येऊन आर्थिक प्रगती करायची आहे. तसेच जेईई, नीट व अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, यासाठी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देणे हाच या कार्यक्रमाचा मुळ हेतू असल्याचे त्यांनी विशद केले.

सदर मार्गदर्शनपर कार्यक्रमात वरोरा येथील रहिवासी श्रीमती शोभा तुमराम यांनी ऑफ्रोट संघटनेला रु. 5 हजार रोख स्वरूपात तर राजुरा येथील श्री. बंडोपंत कोटनाके यांनी 10 हजार रुपयाची देणगी धनादेश स्वरूपात दिली.

तत्पूर्वी, समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे न्यायचा संकल्प ऑफ्रोट संघटनेने घेतला असल्याने उपस्थित मान्यवरांकडून दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच वीर बाबुराव शेडमाके व माता राणी हिराई यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन महिला ऑफ्रोट सेलच्या सचिव श्रीमती ज्योती गावंडे तर आभार संघटक श्रीमती रंजना किन्नाके यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत