चंद्रपूर:- अपंग व मानसिकदृष्ट्या वेडसर असलेल्या दहा वर्षीय मुलीने घरात शौच केले. या कारणामुळे संतापलेल्या बापाने रुमालाने गळा आवळून मुलीची हत्या केली.ही घटना श्यामनगरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी बापाला अटक केली. विजय बारापात्रे असे बापाचे नाव आहे.
चंद्रपूर शहरातील श्यामनगरात विजय बारापात्रे राहतात. त्यांना दहा वर्षीय मुलगी आहे. ती दिव्यांग व मानसिकदृष्ट्या वेडसर आहे. दिव्यांग असल्याने ती एकाच ठिकाणी पडून राहत होती. गेल्या २३ सप्टेंबरला मुलींने घरात शौच केली. त्यामुळे संतापलेल्या विजय बारापात्रे यांनी रुमालाने तिचा गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर हत्येचा हा प्रकार लपविण्यासाठी त्यांनी नैसर्गिक मृत्यूचा बनाव करीत मुलीला पत्नीच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे रामनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला आहे. मंगळवारी (ता. ४) पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, पोलिस हवालदार सुदाम राठोड, पोलिस शिपाई मंगेश सायंकार यांच्या पथकाने केली आहे.