Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

आता वृक्षच देईल स्वत:बद्दलची माहिती #chandrapur #adhari tadoba #tadobaandhari


वनमंत्र्यांच्या हस्ते झाडावरील ‘क्यूआर कोडचे’ लोकार्पण


चंद्रपूर:- झाडाची संपूर्ण माहिती, त्याचे उपयोग आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील वन प्रबोधनीने अभिनव उपक्रम राबवून झाडावर ‘क्यूआर कोड’ विकसीत केला आहे. या क्यूआर कोडचे लोर्कापण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन प्रबोधनीच्या परिसरात नुकतेच करण्यात आले. विशेष म्हणजे या क्यूआर कोडच्या माध्यमातून आता झाड स्वत:बद्दलची माहिती स्वत:च देणार आहे.


‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच बोलणारे झाड असा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर वन प्रबोधनीच्या परिसरातील विविध प्रजातींची झाडे मोबाईलद्वारे ओळखता येऊ शकणार आहे. तसेच प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटी स्वरुपात क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. ‘टॉकिंग ट्री’ या मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाड (Tree) स्वत:बद्दल विविध भाषेमध्ये माहिती देणार आहे.



वन प्रबोधनी परिसरात मोठ्या प्रमाणात वन व वनेत्तर प्रजातींची झाडे असून या ॲपच्या वापरामुळे परिसरातील जैव विविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे.

क्यूआर कोडचे (QR code) लोकार्पण केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विसापूर येथे तयार होणा-या बॉटनिकल गार्डनमध्येही वन विभागाने हा उपक्रम राबवावा. तसेच या उपक्रमाचा विस्तार गंगोत्रीप्रमाणे करण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे. झाडावर क्यूआर कोडची अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल वनमंत्र्यांनी प्रबोधनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांचे अभिनंदन केले.


यावेळी कॅम्पाचे प्रधान मुख्य संरक्षक शैलेश टेंभुर्णे, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत