बल्लारपूर:- बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पादचारी पुल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जखमींवर योग्य उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली व सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भेट देऊन जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृताच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य प्रदान करण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मृताच्या कुटूंबियांना जाहीर केले आहे.
बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घटनास्थळी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. पादचारी पुल कोसळल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. रेल्वे विभागातर्फे मृत शिक्षिकेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतही त्यांनी रेल्वे मंत्र्यांना सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेत जखमींची व त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बल्लारशाहा रेल्वेस्थानकावरील काल प्रवासी पादचारी लोखंडी पूल कोसळल्याने एकूण सतरा प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर होती. त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हालविण्यात आले. रंजना अशोक खरतड, राधेश्याम सिंग आणि नीलिमा भीमराव रंगारी असे तिघे गंभीर जखमी झाले होते. यांतील नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्याला जोडणारे प्रमुख रेल्वेस्थानक म्हणून बल्लारशा स्थानकाची ओळख आहे. बल्लारपूर रेल्वेस्थानकावर एक ते चार रेल्वे फ्लॅाटफार्म आहेत. यातील फलाट क्रमांक तीन ते चारवर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी लोखंडी पूल आहे. याच पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोसळला. यात सतरा प्रवासी जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर तातडीने सहकारी प्रवासी, रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफ दलाने तातडीने जखमींना बल्लारपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविले.