गडचिरोली:- अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडून साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदारास आज (दि.३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शकील बाबू सय्यद (वय ५०) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
तक्रारकर्त्याच्या आतेभावावर एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. परंतु, त्याला अटक न करता जामीन मंजूर करण्यासाठी हवालदार शकील सय्यद याने तक्रारकर्त्यास ३ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी पोलीस ठाण्यात सापळा रचला. यावेळी तपास कक्षात तक्रारकर्त्याकडून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार शकील सय्यद यास रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, शिपाई राजू पद्मगिरीवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, विद्या म्हशाखेत्री, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.