महोत्सवाच्या निमित्ताने रंगणार शहरातील भिंती! #Chandrapur

राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवात प्लास्टीक बंदीवर सुंदर असा संदेश देणारी चित्र...... चित्रकार सुहास अशोक ताटकंटीवारचंद्रपूर:- चंद्रपूर शहरात 23 ते 26 डिसेंबर दरम्यान चालणार्‍या भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र (Wall Painting) महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते आझाद गार्डन येथे करण्यात आले. आयुक्तांनी फीत कापून तसेच स्वहस्ताने चित्र काढून महोत्सवाची सुरवात केली.

महाराष्ट्र राज्यातील हौशी व व्यावसायिक अशा 630 स्पर्धकांनी यात नोंदणी केली असून, 140 वैयक्तीक स्पर्धक, तर विविध शहरातील 48 चमू चित्रकारितेत व्यस्त आहेत. कलात्मक चित्रे काढण्यास विविध ठिकाणे भिंती महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

भिंतींवर पांढरा रंग लावून स्वच्छ करून देण्यात आल्या आहे. स्पर्धेची सुरवात झाली असून, आयुक्तांनी या सर्व स्थानांवर भेटी देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग, वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या 3 स्पर्धा यात घेण्यात येत आहेत. भाग घेणार्‍या स्पर्धकांची जेवण, पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत असून, रंगरंगोटीसाठी आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा मनपातर्फे करण्यात येत आहे.

स्पर्धा ही शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेण्यात येत असून, विचार प्रवर्तक आणि नाविन्यपूर्ण अशी भिंत्ती चित्रे तयार करु शकणार्‍या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, पर्यावरण संरक्षण, स्वच्छतापर संदेश, प्लास्टीक बंदी, चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव, रेन वॉटर हार्वेस्टींग अशा विविध 14 विषयांचे चित्रण केले जाणार आहे. स्पर्धे अंतर्गत मोठी बक्षिसे ठेवण्यात आली असून, स्पर्धकांचा उत्साह पाहण्याजोगा आहे.

आझाद बागेत झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे यांनी केले. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, विधी अधिकारी अनिल घुले, वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, डॉ. गोपाल मुंधडा आणि सर्व योग्य नृत्य परिवाराचे सदस्य तसेच मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत