चंद्रपूर:- चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर - चित्रपटांचा पूर्वी प्रभाव होताच . पण अलीकडे काही वर्षात तो कमी होत आहे, तर दुसरीकडे राजकारण्यांचा प्रभाव देखील निश्चितच कमी झाला आहे. सामाजिक माध्यमे मात्र प्रभावी झालेली असतांना मुद्रित माध्यमे आजही वास्तवदर्शी आहे. लेखणीवर आजही तेथे संयम असल्याचा सुर चर्चासत्रातील वक्त्यांच्या बोलण्यातून उमटला.
जनमानसावर प्रभाव – माध्यमांचा, चित्रपटांचा की राजकारणाचा या 'महाराष्ट्र टाइम्स' चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांच्या अध्यक्षतेखालील झाले. यात अकोला येथील स्तंभलेखिका मोहिनी मोडक, नागपूर येथील प्रख्यात शेफ विष्णू मनोहर व वणी येथील राजकीय अभ्यासक डॉ. अजय देशपांडे सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना मोहिनी मोडक म्हणाल्या की, चित्रपटांचा पूर्वी निश्चित प्रभाव होता. पण आज ‘ओटीटी’ पर्यंत आपण पोहचलो आहोत. ‘मनोरंजन हाच महत्वपूर्ण भाग असून आपल्या मातीतील चित्रपट गर्दी खेचत असल्याचे अलीकडे दिसत आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून लोकांना अपेक्षाच नसल्याचे त्यांनी सांगितले.
विष्णू मनोहर म्हणाले की, अभिनय अंगात मुरवावा लागतो, फक्त पडद्यावर दिसतो तो अभिनय असला तरी रोजच्या जीवनात आपण अभिनय करीत असतो. असे सांगत या सामाजिक माध्यमांमुळे लोक ‘शेफ’ झाली आहेत हे नाकारता येणार नाही.
मराठी साहित्याचा प्रभाव निश्चित नाही असे चित्र असतांना मुद्रित माध्यमे आजही वास्तवदर्शी आहे. लेखणीवर आजही संयम आहे. वाहत जाणाऱ्या वाह्यात राजकारण्यांकडे किती लक्ष द्यायचे त्यामुळे राजकारण्यांचा प्रभाव ओसरला असल्याचे डॉ. अजय देशपांडे म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना श्रीपाद अपराजित म्हणाले की, शेतकरी जगतो कसा यावर देखील गांभीर्याने वृत्तांकन होणे गरजेचे आहे. समाजाचे स्खलन सर्वच क्षेत्रात दिसत असून आपल्यापासून परिवर्तन होईल हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी वर्तन सुधारले पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन सुधीर मोते तर आभारप्रदर्शन ज्ञानेश हटवार यांनी केले.