Top News

अयोध्या श्री राम मंदिरासाठी लागणाऱ्या काष्ठचे बुधवारी पूजन व शोभायात्रा #chandrapur #ballarpur


शोभायात्रा महाराष्ट्राचा चित्ररथ होणार सहभागी

पत्रकार परिषदेत ना. सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती 


चंद्रपूर:- अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोलीच्या जंगलातील सागवान लाकडाचा उपयोग केला जाणार आहे. श्री राम नवमीच्या पावनपर्वावर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून पवित्र सागवान काष्ठाची भव्य शोभायात्रा चंद्रपूर येथे काढण्यात येणार आहे. चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे. अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जास्तीत जास्त रामभक्तांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत मंत्री मुनगंटीवार म्हणाले, या सोहळ्यासाठी उद्या सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरला येणार आहेत. महाकाली मंदिरापासून ते पुढचा प्रवास ते यात्रेसोबत करतील. त्यानंतर नागपूरच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील. उत्तरप्रदेशातून काशी विश्‍वनाथ बनारसचे पालकमंत्री रवींद्र जयस्वाल, उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, बलियातून निवडून आलेले वन व पर्यावरण राज्यमंत्री अरुण सक्सेना यांच्यासह खास राम भजनासाठी कैलास खेर उपस्थित राहणार आहेत

विदर्भाशीसुद्धा प्रभू रामाचे नाते आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे वडील राजा दशरथांची आई इंदुमती ही विदर्भातली (Vidarbha) आहे. लाकूड जसं महाराष्ट्रातून (Maharashtra) त्यांच्या आजीच्या भूमीतून चालले. सर्व रामभक्त मग तो कोणत्याही जाती धर्म, धर्म, पंथाचा असो. याचा प्रत्येकाला आनंद आहे. संकल्प पूर्ण रोण्याचा आणि स्वप्नाची पूर्तता होण्याचा हा आनंदोत्सव उद्या बल्लारपूर आणि चंद्रपूरमध्ये शोभायात्रा काढून साजरा केला जाणार आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले, ही शोभायात्रा दोन भागात होणार आहे. विशेष म्हणजे या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील (लाल किल्ला परेड) प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा 'नारीशक्ती - साडेतीन शक्तीपिठे' हा चित्ररथ सहभागी होणार आहे. तसेच या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून या शोभायात्रेत जग प्रसिद्ध रामायण धारावाहिकेत प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, माता सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया व लक्ष्मणाच्या भूमिकेला मूर्तरूप देणारे सुनील लहरी यांची उपस्थिती राहणार आहे.

श्री राम नवमीच्या पावनपर्वाच्या पूर्वसंध्येला २९ मार्च बुधवार २०२३ ला बल्लारपूर येथून पवित्र सागवान काष्ठाची भव्य शोभायात्रा चंद्रपूर येथे येणार आहे. या शोभयात्रेत जग प्रसिद्ध रामायण धारावाहिकेत प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल,सिताची भूमिका करणारी दीपिका व लक्ष्मणाच्या भूमिकेला मूर्तरूप देणारे सुनील लहरी यांची उपस्थिती राहणार आहे.

विशेष म्हणजे शोभयात्रेनंतर बुधवारी रात्री ९ वाजता चांदा क्लब ग्राउंड येथे काष्ठ पूजन व सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या भक्तीगीतात तल्लीन होऊन प्रभू श्री रामाची आराधना केली जाईल.

देशाच्या अभिमानाचे केंद्र ठरलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणी करिता अत्यावश्यक सागवान मागवले गेले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि समाजातील श्रीरामभक्तीला उजळवणारी बाब आहे.त्यामुळेच चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.

ही शोभायात्रा दोन भागात होणार असून २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी ३.३० वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं.४ वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल.

त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ ९ पर्यंत चालेल.या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण ४३ प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून १ हजार १०० असे एकूण २ हजार १०० कलाकार हे सादरीकरण करणार आहेत.

या काष्ठपूजन सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनरूभारणीत अनेकांचे हात लागले आहे आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडून प्रभू श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहे, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने