जनसंवाद विभागाच्या विद्यार्थांशी साधला संवाद #chandrapur


माध्यमे ही समाजाचा आरसा:- अभिनेत्री राधासागर

चंद्रपूर:- माध्यमे हा समाजाचा आरसा आहे. पण हल्ली खूप नकारात्मक गोष्टी पण वाढल्यात. पूर्वी काही छापून आले वा दुरचित्रवाणीवर बघितले की, तेच खरे आहे असे असायचे. पण आता 'टीआरपी' थोडे महत्वाचे झाले आहे. अर्थात त्याच्या सकारात्मक- नकारात्मक बाबी आहेत असे असले, तरी या क्षेत्रातील अनेक जण खूप वर्षांपासून झोकून काम करताहेत, जे समाजातही महत्वपूर्ण ठरत असून माध्यमे ही आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात टेलिव्हिजन अभिनेत्री राधासागर यांनी येथे बोलताना केले.


सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थांशी त्यांनी येथे आल्यावर संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, आज सामाजिक माध्यमे प्रबळ झालेली आहेत. एक कलाकार म्हणून कुठेही बोलतांना वा फोटो पोस्ट करतांना खूप विचार करावा लागतो. कोणाला काहीही वाटू शकते. त्यावरून आम्हीच 'ट्रोल' होण्याची भीती असते. मग 'मिडिया' छोट्या गोष्टींना मोठे करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुठलीही एखादी आवडणारी कला सुरुवातीला आपण छंद म्हणून करतो. मग 'पॅशिनेटली' ते करायला लागतो. कुठल्याही कला जोपासने हा एक ध्यासच आहे, ती तपश्चर्याच आहे. त्यासाठी जेवढे 'स्ट्रगल' कराल, तेवढे शिकत जाल. पण चित्रपट क्षेत्रात योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे नमूद करीत अन्यथा दिशा चुकू शकते. आपल्या कानावर खूप गोष्टी येतात, या उद्योगाबाबत बोलले जाते, पण येथे चांगल्याही खूप गोष्टी आहेत. चांगलीही बाजू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी 'कास्टिंग डायरेक्टर' सारंग कर्णिक यांनीअलीकडे 'माध्यम' क्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या असून जनसंवाद अभ्यासक्रमातून विद्यार्थांना रोजगाराची उत्तम संधी प्राप्त होऊ शकते असे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्या पुढाकारात हा उपक्रम पार पडला. यावेळी जनसंवाद विभागप्रमुख डॉ. पी. ए. मोहरीर, प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. पद्मरेखा धनकर प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमासाठी जनसंवाद विभागाचे प्रा. एस. बी. रामगिरवार, प्रा. ए. डी. खोब्रागडे यांचेही मोलाचे योगदान मिळाले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या