Click Here...👇👇👇

भीममय..... 'जयभीम'मय चंद्रपूर #chandrapur #JayBhim

Bhairav Diwase

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष


चंद्रपूर:- महिलांना शिक्षण, मतदानाचा, संपत्तीचा हक्क, प्रसुती रजेचा लाभ, कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना, भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना, सिंचन सोयींसाठी देशात पहिले धरण उभारण्याचे पाऊल, देशाचा कारभार चालतो ते संविधान आणि अशा कितीतरी मानवी हक्काच्या, हिताच्या गोष्टी करीत आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान देणारे युगपुरुष, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात चंद्रपूरात साजरी करण्यात आली.


भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे उत्सव आणि उत्साहाचा क्षण. हा उत्साह शुक्रवारी १३२ व्या जयंतीनिमित्त दिसून आला. चंद्रपूर शहरातील कानाकाेपऱ्यात, महामानवाच्या जयंतीच्या जल्लाेषात न्हाउन निघाल्या. रस्त्यारस्त्यावरून 'जयभीम' चा जयघोष करीत निळ्या पाखरांचे थवेच्या थवे धावत होते. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली.

घरांचे दार, वस्त्यांचे गेट अन रस्ते तोरण, पताका, पंचशील ध्वज आणि निळ्या कमानींनी सजले. तसे जयंतीच्या आदल्या दिवशीपासूनच शहरात उत्साह संचारला होता. मुक्त श्वासाने शुक्रवारी सकाळपासूनच अनुयायांची पावले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे वळली. पांढरे शुभ्र वस्त्र, निळ्या पताका, पंचशील ध्वज घेऊन वस्त्यावस्त्यांमधून मिरवणुका निघाल्या. दिवसभर हजारो अनुयायांनी नतमस्तक होत तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी जनू संपूर्ण चंद्रपूर शहरच भीममय... 'जयभीम'मय झाले होते.

साेशल मीडियावर शुभेच्छांचा पूर

साेशल मीडियावर भीमजयंतीच्या शुभेच्छा संदेशांनी ओसंडून वाहत हाेता. फेसबुक, व्हाॅट्सॲप, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या छवीतील डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र, त्यांचे विचार, तत्वज्ञान, संदेश पाठवून महामानवाच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. देशाचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, संविधान, कायदे निर्मिती, ऊर्जा, वनसंवर्धन अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांच्या बहुआयामी कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे संदेश सर्वत्र फिरत हाेते. एकूणच बाबासाहेबांच्या जयंतीचा ऐतिहासिक साेहळा सर्वच स्तरावर साजरा करण्यात आला.