Top News

तांबा तार चोरी करणारी टोळी गजाआड #chandrapur #Wardha


वर्धा:- शहरातील स्नेहलनगरातील मोटर रिवायडिंग दुकानाचे शटर तोडून दुकानातील 150 किलो तांब्याचे तार अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती स्थानिक गुन्हे शाखेने तांबा तार चोरी करणार्‍या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख 62 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये पथकाने शोध घेतला असता चेतन ठाकरे (25) रा. मंगरूळ दस्तगीर जि. अमरावती ह. मु. शांतीनगर वर्धा यास सावंगी (मेघे) येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सोहेल उर्फ कचरा जुला (27) रा. अशोकनगर, बार्शी नाका, बिड ह. मु. दिग्रस जि. यवतमाळ याच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे सोहेलला यवतमाळ येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी केली असता मोहम्मद मतीन मोहम्मद अशरफ (44) रा. शारदा चौक, इंदिरा नगर, यवतमाळ यास तांबा तार विक्री केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

गुन्ह्यातील चोरीस गेलेला तांब्याचा तार, गुन्हा करण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य, मोबाईल, दोन साधे मोबाईल, एक चारचाकी वाहन जप्त केले. या तिघांनाही अटक करून शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, श्रीकांत खडसे, प्रदीप वाघ, नितीन इटकरे, रामकिसन इमर आदींनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने