Click Here...👇👇👇

पोंभुर्ण्यावरुन पुन्हा पेटला वाद #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

खासदार म्हणतात, कुणीही श्रेय घेऊन पाठ थोपटवून घेऊ नये!


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने बाजी मारत १२ जागांवर विजय प्राप्त केला आहे. पोंभुर्णा बाजार समितीवर विजय आमचाच होणार असे, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी परवा, शनिवारी (ता. २९ एप्रिल) सांगितले होते. त्यानुसार निकालही आला.

पोंभुर्णा बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी काल मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान पार पडले. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी परवा ‘सरकारनामा’शी बोलताना पोंभुर्णावर ‘शतप्रतिशत’ कॉंग्रेस निवडून येईल, असा विश्‍वास व्यक्त केला होता, तो खरा ठरला. पण आज खासदार बाळू धानोरकर यांनी पोभुर्णा बाजार समिती त्यांनी निवडून आणल्याचा दावा केला.

पोंभुर्णा बाजार समिती निवडून आणण्यासाठी मी आणि माझ्या टीमने पूर्ण प्रयत्न केले. पण या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आणखी कुणीतरी करीत आहे. त्यांनी फुकटचे श्रेय घेऊन स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, असे बाळू धानोरकर यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता म्हटले आहे. तर पोंभुर्णा बाजार समिती निवडून आणण्यासाठी आमच्या टीमने एकत्रितपणे प्रयत्न केल्याचे आमदार वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या या दोन दिग्गज नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. बाजार समितीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामध्ये खासदार धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोंभुर्णा बाजार समिती आम्हीच निवडून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. जेव्हा की, पोंभुर्णा बाजार समितीवर कॉँग्रेसचाच विजय होणार, हे आमदार वडेट्टीवारांनी मतदानाच्या आधीच म्हणजे शनिवारी (ता. २९ एप्रिल) सांगितले होते. त्यानंतर आज खासदार धानोरकर यांनी दावा केल्यामुळे या दोन नेत्यांमध्ये मोठा वाद पेटल्याचे दिसत आहे.

यासंदर्भात कॉंग्रेसचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष रविंद्र मरपल्लीवार यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडी चा विजय झाला आहे. खासदार बाळू धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, विनोद अहिरकर, जगन येलके, वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उतरली होती. आणि १२ जागांवर विजय मिळविला.


यासंदर्भात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही एक टीम म्हणून काम करीत असतो. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या निवडून आणण्यासाठी सर्व नेत्यांचे योगदान आहे. खासदार बाळू धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार दोघांनी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. त्यामुळेच १२ पैकी नऊ बाजार समित्यांवर आम्ही सत्ता प्रस्थापित करू शकलो.

चोखारेंची तक्रार..

यापूर्वीचे सभापती दिनेश चोखारे यांनी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्या विरोधात आम्ही राज्य सरकारकडे तक्रारही दाखल केली आहे. गंगाधर वैद्य यांनी ती तक्रार केली आहे. त्यावर काय कारवाई होते, याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असेही प्रकाश देवतळे ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.