प्रकाश देवतळे यांची चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी* #chandrapurचंद्रपूर:- पक्षादेश झुगारत चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी उघड युती करून निवडणूक लढणारे आणि खासदार बाळू धानोरकर गटाचा पराभव केल्याच्या आनंदात ढोलताशा व गुलालाची उधळण करत भाजपा जिल्हाध्यक्षांसोबत डान्स करणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत देवतळे यांनी पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून त्यांना पद गमवावे लागले आहे.

काँग्रेस आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून एकत्र जल्लोष साजरा

लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आदानी समुहातील महाघोटाळ्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठविलेला आवाज भाजपाने हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भाजपा विरोधात थेट संघर्ष करत असताना भाजपाशी कोणत्याही पद्धतीची हात मिळवणी करणे अयोग्य आहे. या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपा किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये अशा स्पष्ट सूचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.

मात्र तरीदेखील नुकत्याच झालेल्या चंद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष देवतळे यांनी उघड उघड भाजपासोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे. आपले हे कृत्य पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे आपल्याला चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे आणि आपला पदाचा प्रभार पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत