प्रेयसीच्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार #nagpur
नागपूर:- पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे फेसबुकवरून एका युवकाशी सूत जुळले. परंतु, या नराधमाची वाईट नजर प्रेयसीच्या दहा वर्षांच्या मुलीवर गेली. प्रेयसी घरी नसताना त्याने या मुलीवर बलात्कार केला.

पोटात दुखत असल्याची तक्रार मुलीने केल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

धीरज ताडे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हा बांधकाम मिस्त्री आहे. त्याची २०२० मध्ये एका ३० वर्षाच्या महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. दोघांचा संपर्क वाढला आणि त्यांच्यात सूत जुळले. दरम्यान, ही महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली. महिलेला १० आणि आठ वर्षांच्या दोन मुली आहेत. धीरजसोबत प्रेमसंबंध वाढल्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. अविवाहित असल्यामुळे धीरजने या महिलेस लग्नाचे आमिष दाखविले तसेच तिच्या दोन्ही मुलींना सांभाळण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे महिलेने माहेर सोडले आणि ती धीरजसोबत राहू लागली.

काही दिवस धीरजने प्रेयसी आणि मुलींना चांगली वागणूक दिली. परंतु, नंतर तो दारूच्या आहारी गेला. तो दारू पिऊन महिलेच्या १० वर्षांच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहायला लागला. तो प्रेयसीला घेऊन मुंबईला कामासाठी गेला. वर्षभर तेथे काम केल्यानंतर तो परत आला. काही दिवसांपासून रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर तो महिलेच्या १० वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करू लागला होता. कुणालाही काही सांगितल्यास घराबाहेर काढण्याची धमकी त्याने या मुलीला दिली. त्यामुळे ही मुलगी त्याचे अत्याचार सहन करीत होती.

शुक्रवारी या मुलीची आई कामासाठी बाहेर गेली होती. घरी दोन बहिणी आणि आरोपी धीरज होता. दुपारच्या वेळी नराधम धीरजने १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. मुलीने त्याला विरोध केला, परंतु त्याच्या समोर तिचे काही चालले नाही आणि त्याने या मुलीवर बलात्कार करून तिचा धमकी दिली. सायंकाळी आई घरी परतल्यावर मुलीने आईला पोटात दुखत असल्याची तक्रार केली. महिलेने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने धीरजने आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. तिने मुलीला घेऊन थेट सदर पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार दिली. सदर पोलिसांनी आरोपी धीरजविरुद्ध विविध कलमांतर्गत तसेच पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत